Maratha Reservation : जरागेंच्या उपोषणाला चिखलीकरांचा पाठिंबा, तर अशोक चव्हाणांनी राजीनामा देण्याची मागणी; मराठा आंदोलकांचा फोन कॉल व्हायरल
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमदार चिखलीकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवदेन दिलं. तर एका मराठा आंदोलकाने काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केलीये.
नांदेड : मराठा आंदोलनाची (Maratha Reservation) धग सध्या वाढत आहेत. त्यातच मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणामुळे सरकारवरील ताण देखील दिवसागणिक वाढत चाललाय. त्यातच अनेक खासदार आणि आमदार या मराठा आक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं पाहायला मिळतय. भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व मागण्यांना तसेच मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला लगेचच आरक्षण द्यावे अशी मागणी देखील चिखलीकरांनी यावेळी केली. तर त्याचवेळी काँग्रसचे नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे. यासंदर्भातील मराठा आंदोलकांचा एक फोन कॉल व्हायरल झालाय.
आमदार चिखलीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवदेन दिलं. त्यांनी या निवदेनात म्हटलं की, महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासात मराठा समाजाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. मराठा समाजाच्या मुख्य व्यवसाय शेती असून 99 टक्के मराठा समाज हा अल्पभूधारक आहे. मराठा समाजाची आर्थिक स्थितीही बिकट आहे. तसेच आरक्षण नसल्यामुळे गरिब मराठा कुंटूबांतील मुले शैक्षणिक आणि नोकरीच्या सुविधांपासून वंचित राहतात. याचा परिणाम मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढतय. मी लोकप्रतिनिधी या नात्याने मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व मागण्यांना आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठींबा देतो. मराठा समाजास आरक्षण त्वरीत द्यावे अशी मागणी देखील करत आहे.
अशोक चव्हाणांनी राजीनामा देण्याची मागणी
याचदरम्यान काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण याच्या राजीनाम्याची मागणी मराठा आंदोलकांकडून करण्यात आली आहे. याचसंदर्भातील एक फोन कॉल सध्या व्हायरल होत आहे. अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून तुम्ही राजीनामा द्या, अशी मागणी करणारी एक ऑडिओ क्लिप नांदेडमध्ये सोशील मीडियावर व्हायरल झाली. . नांदेडच्या येहळेगाव इथल्या एका तरुणाने चव्हाण यांना कॉल करत ही मागणी केली. तुमच्यासह काँग्रेसच्या सर्वांनी राजीनामे दिले तर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा या युवकाने केलाय. दरम्यान अशोक चव्हाणांनी या फोनवर त्या तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सध्या ही ऑडिओ क्लिप सोशीलमीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतयं.
राजीनामे देण्यापेक्षा एकत्र या, जरांगेंचं आवाहन
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. यावर देखील मनोज जरांगे यांनी राजीनामा न देण्याचं आवाहन आमदार आणि खासदारांना केलंय. यावर बोलताना म्हटलं की, राजीनामे देऊन आपलीच संख्या कमी होईल. राजीनामे देण्या पेक्षा एकत्र या. मुंबईत बसून सरकार ला वेठीस धरा. राजीनामे देऊ नका. सगळ्यांनी मुंबईकडे कूच करा. समाज तुम्हाला विसरणार नाही.