Nanded : नांदेडमध्ये चाकूचा धाक दाखवून चोरी, चार लाखाचा ऐवज लंपास; वृद्ध महिलेचा मृत्यू
Nanded Crime: नांदेडमधील देगलूर महाविद्यालयाच्या शेजारी एक चोरीची घटना घडली आहे. येथील लालबहादूर शास्त्री नगर मधील एका वृद्ध जोडप्याच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी दोन्ही वृद्धांचे हातपाय बांधून चोरी केली आहे.
![Nanded : नांदेडमध्ये चाकूचा धाक दाखवून चोरी, चार लाखाचा ऐवज लंपास; वृद्ध महिलेचा मृत्यू Nanded crime news They broke into a house in Nanded and stole four lakh rupees Nanded : नांदेडमध्ये चाकूचा धाक दाखवून चोरी, चार लाखाचा ऐवज लंपास; वृद्ध महिलेचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/40e9a9fe9462ef832235df594fdc9aff1674451792745469_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nanded Crime: नांदेडमधील देगलूर महाविद्यालयाच्या शेजारी एक चोरीची (Theft) घटना घडली आहे. येथील लालबहादूर शास्त्री नगर मधील एका वृद्ध जोडप्याच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी दोन्ही वृद्धांचे हातपाय बांधून चोरी केली आहे. या चोरट्यांनी अंदाजे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या दरम्यान घरातील वृद्ध महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना 23 जानेवारीच्या रात्री साडेअकरा वाजता घडली. घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील येडूर येथील श्रीपतराव पाटील (90) व चंद्रकलाबाई (60) हे दोघे मागील काही वर्षापासून देगलूर उदगीर या मुख्य रस्त्याच्या लगत असलेल्या लाल बहादुर शास्त्री नगर मध्ये एकत्र रहात होते. तीन-चार वर्षांपूर्वी चंद्रकला बाईच्या संपत्तीवरून त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता, अशी चर्चा घटनास्थळी चर्चिली जात आहे. सोमवार 23 जानेवारीच्या रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात तीन अज्ञात चोरांनी प्रवेश करुन एका चोराने श्रीपतराव पाटील यांच्या तोंडावर पाय देऊन त्यांचे हातपाय बांधून चाकूचा धाक देत उभा राहिला. तर बाकीच्या दोन चोरांनी चंद्रकलाबाई आरडाओरड करू नये म्हणून तिचे तोंड व पाय कापडाने बांधून लुटालूट केली. चोरांनी कपाटात ठेवलेले 5 तोळे सोन्याचे कडे, 70 तोळे चांदीचे वाळे काढून घेतले. नंतर चंद्रकलाबाईच्या अंगावरील एका तोळ्याचे सोन्याचे मनी, दीड तोळ्याची बोरमाळ, 5 तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या, असे एकूण साडेबारा तोळे सोन्याचे दागिने आणि 70 तोळ्याचे वाळे असा 3 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्यासह एलसीबीचे अधिकारी व कर्मचारी असा फौजफाटा व श्वान पथकास घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनेची इत्यंभूत माहिती घेऊन तपासा संदर्भात योग्य त्या सूचना दिल्या आहेत. घटनेलगत असलेल्या तरंग बारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली. या दरम्यान त्यामध्ये वीस ते पंचवीस वयोगटातील तीन तरुण मुख्य रस्त्यावरून जात असल्याचे त्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
श्रीपतराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्याविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात कलम 397, 302, 34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील वृद्ध महिलेचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी सांगितलं. या नेमका चोरीचा प्रकार आहे की, संपत्तीच्या वादातून ही घटना घडली आहे? याचाही उलगडा आरोपीला पकडल्या नंतरच निष्पन्न होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)