पती तुरुंगात अन् पत्नीचे दोघांसोबत जुळाले सूत; अनैतिक संबंधातून खून प्रकरणात आरोपीला आजन्म कारावास
Nanded Court Judgment : खून प्रकरणात न्यायालयाने अरोपीला जन्मठेप आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
नांदेड : जिल्ह्यातील वजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या महिलेच्या खून प्रकरणात आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका महिलेचे दोन पुरुषांसोबत अनैतिक संबंध असतांना, त्यातून एकाने भोसकून दुसऱ्याची हत्या केली होती. 2008 मध्ये ही घटना घडली होती आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायलयात दाखल केले होते. त्यानंतर या प्रकरणात निकाल देतांना जिल्हा सत्र न्या. नागेश न्हावकर यांनी आरोपीला जन्मठेप आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
अधिक माहितीनुसार, 21 वर्षीय विवाहितेचा पती खून प्रकरणात तुरुंगात होता. दरम्यान, या काळात बाहेर असलेल्या तिच्या पत्नीचे मनदीपसिंघ नानकसिंघ काटघर या तरुणाशी सूत जुळले. बऱ्याच दिवस चांगले राहिल्यानंतर त्यांच्यात वाद सुरु झाले. पुढे मनदीपसिंघ तिला वाईट वागणूक देऊ लागला आणि मारहाण देखील करू लागला. त्यामुळे त्याच्या रोजच्या त्रासाला महिला कंटाळली होती. याच काळात महिलेची फेसबूकवरुन सुरजितसिंघ उर्फ कालू लहेरसिंघ मिलवाले याच्याशी ओळख झाली. त्यानंतर महिलेचे कालू याच्याशी प्रेमसंबंध जुळले.
थेट तलवारीने हल्ला करत जागीच ठार केलं...
दरम्यान, 23 ऑगस्ट 2018 च्या रात्री मनदीपसिंघ हा त्या महिलेच्या घरी गेला होता. यावेळी तिथे सुरजितसिंघ होता. सुरजितसिंघला पाहून मनदीपसिंघला प्रचंड राग आला आणि त्याने हातात तलवार घेवून सुरजितसिंघ याला धमकावले. त्यामुळे, सुरजितसिंघने आपला मावस भाऊ लक्कीसिंघ मिलवाले याला फोन करुन बोलवून घेतले. त्यानंतर लक्कीसिंघ यांनी मनदीपसिंघ याची समजूत घालून त्याला तेथून पाठवून दिले. परंतू, रात्री 2 वाजेच्या सुमारास लक्कीसिंघने भांडण मिटविण्यासाठी मनदीपसिंघला पुन्हा बोलावून घेतले. यावेळी रागात असलेल्या मनदीपसिंघ याने सुरजितसिंघ उर्फ कालू याच्यावर तलवारीने हल्ला केला. त्यातच त्याचा मृत्यू झाला होता.
न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली
दरम्यान, या प्रकरणात लक्कीसिंघ मिलवाले याच्या तक्रावरीवरुन वजीराबाद पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सपोनि. सुनील मुडे यांनी केला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुरावे जमा केले होते. सोबतच त्यांचे फोन कॉल हिस्ट्री आणि इतर काहींचे जबाब नोंदवून न्यायलयाच्या समोर मांडले होते. त्यामुळे या प्रकरणात सर्व पुरावे आणि पोलिसांचा तपास महत्वाचा ठरला. शेवटी या प्रकरणात निकाल देतांना न्यायालयाने मनदीपसिंघला जन्मठेप आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Crime News : लुडो खेळावरून मित्रांमध्ये झाला वाद, थेट बरगडीत चाकू खुपसून केला वार