Maratha Reservation : कुठे चक्का जाम, तर कुठे राजकीय नेत्यांना गावबंदी; नांदेड जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम
Maratha Reservation : आता राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्याचा निर्णय देखील घेण्यात येत असल्याचे समोर येत आहे.
नांदेड : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरात आंदोलन केले जात आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आंदोलनाची धग आता गावागावात पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठे साखळी उपोषण, कुठे आमरण उपोषण, कुठे चक्क जाम तर कुठे रास्ता रोको करण्यात येत आहे. तर आता राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्याचा निर्णय देखील घेण्यात येत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे, आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापताना पाहायला मिळत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर हदगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे यवतमाळ आणि नांदेड दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हडसनी येथील दत्ता पाटील यांनी आमरण उपोषण केले होते. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते. आता जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर पुन्हा दत्ता पाटील हडसनिकर यांनी उपोषण सुरू केले असून, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे, दत्ता पाटील आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून कोथळा येथील ग्रामस्थांनी नागपूर तुळजापूर मार्गावर हदगावजवळ चक्काजाम आंदोलन सुरू केले. सकाळी दहा वाजता या चक्काजाम आंदोलनाला सुरवात झाली होती. या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश नाही, अशा आशयाचे फलक काही गावात लावण्यात आले आहेत. नांदेड जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील मेंढला आणि उमरी या गावात नेत्याच्या गावबंदीचे फलक लावण्यात आले. चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण हेच आमचं लक्ष...असे यावर उल्लेख करण्यात आला आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांना गावात प्रवेश नाही. असा मजकूर या फलकावर आहे. मेंढला येथील गावकऱ्यांनी नेत्याच्या गावबंदीसह मतदानावर बहिष्कार घालण्याचा देखील निर्णय घेतला आहे. उमरी गावात देखील असे फलक लावण्यात आले. दोन्ही गावातील काही तरुण जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणावर देखील बसले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आता गावागावात पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: