Nanded News : डोळ्यात चटणी टाकून छातीत चाकू खुपसला; मेहुण्यानेच भाऊजीचा गेम केला
Nanded Crime : आधी डोळ्यात चटणी टाकून आणि त्यानंतर छातीत चाकू खुपसून मेहुण्यानेच भाऊजीचा खून केल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे.
Nanded Crime : नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) किनवट तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, आधी डोळ्यात चटणी टाकून आणि त्यानंतर छातीत चाकू खुपसून मेहुण्यानेच भाऊजीचा खून केला आहे. किनवट तालुक्यातील धानोरा (चि) येथे गुरुवारी (2 मे) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. आहे. तर आरोपी मेहुण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंकुश माधव शेळके (28 वर्षे, रा. पिंपरफोडी) असे मयत भाऊजीचे नाव आहे. तर राजू वानोळे (वय 19 वर्षे, धानोरा, ता. किनवट, नांदेड) असे आरोपी मेव्हण्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश शेळके हा आपल्या पत्नीसह नेहमी वाद घालून भांडण करायचा. दरम्यान पती पत्नीच्या भांडणामुळे अंकुश शेळके यांची पत्नी माहेरी धानोरा (चि) येथे राहत होती. असे असताना मंगळवारी पत्नीला आणायला अंकुश शेळके हा धानोरा येथे गेला होता. पण पत्नीने सोबत जाण्यासा सुरुवातीला नकार दिला. मात्र त्याने पत्नीची समजूत काढली. त्यानंतर पत्नी सोबत जाण्यासही तयार झाली. दरम्यान याचवेळी तिथे अंकुश शेळकेचा मेहुणा राजू वानोळे हा तेथे आला. राजूने बहिणीला भाऊजीसोबत जाण्यास विरोध केला.
राजूने बहिणीला भाऊजीसोबत जाण्यास विरोध केल्याने अंकुश शेळकेसोबत त्याचा वाद झाला. त्यामुळे याच वादादरम्यान भाऊजी अंकुश शेळके यांच्या डोळ्यात राजूने आधी चटणी टाकली. त्यानंतर चाकू छातीत खुपसला. त्यामुळे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंकुश शेळके याचा मृत्यू झाला. तर या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे आणि त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. तसेच आरोपी राजू वानोळे हा पसार होण्याआधीच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरीरातून अतिरक्तस्त्राव होऊन रस्त्यावर कोसळला
अंकुश शेळके याच्या छातीत राजूने चाकू खुपसला, ज्यात अंकुश गंभीर जखमी झाला. त्यानंतर अंकुश यांना प्रचंड वेदना होत होत्या. मात्र तशाही स्थितीत अंकुश हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धावू लागला. मात्र शरीरातून अतिरक्तस्त्राव होऊन रस्त्यावर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी राजू वानोळे यास ताब्यात घेतले असून, तपासातच खुनाच्या कारणांचा उलगडा होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: