Nanded: अर्धापूरच्या केळीला सोन्याचे दिवस; मिळाला प्रतिक्विंटल 2300 चा विक्रमी दर
Nanded Bananas: आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना एवढा मिळाला आहे
Ardhapur Bananas: जळगावनंतर राज्यात केली उत्पादनात नांदेड जिल्ह्याचा नंबर लागतो. अर्धापूरची केली फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशासह जगभरात प्रसिद्ध आहे. खायला रुचकर आणि चवदार असेल्या अर्धापूरच्या केळीला परदेशात विशेष मागणी आहे. दरम्यान यावर्षी पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्याने सद्या स्थानिक बाजारात केळीला 2300 रुपये क्विंटलाचा विक्रमी भाव मिळाला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आले आहे.
केळीला क्विंटलला 2200 ते 2300 रूपये इतका विक्रमी दर आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाला आहे. त्यामुळे केळीचा एक घड 250 ते 300 रूपयेला विकला जात आहे. विशेष म्हणजे हा दर स्थानिक बाजारातच विक्रमी दराने मिळाला आहे. यापूर्वी 1800 रूपये क्विंटलचा दर मिळाला होता. पण त्यापुढे दर कधीच गेला नव्हता, असे केळी उत्पादक शेतकरी सांगतात. अर्धापुरी केळी खाण्यास रुचकर व चविष्ट असल्याची तिची ओळख आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्याच्या नावाने, अर्धापुरी नावाची केळी देशभर प्रसिद्ध आहेत. ही केळी चविष्ट आणि टिकाऊ आहे. किमान आठ दिवस केळी राहते. त्यामुळे अफगाणिस्तान, तुर्कस्तान, इराण, इराक, दुबई या देशांत येथील केळीची निर्यात केली जाते.
गतवर्षी झालं मोठ नुकसान...
नांदेडसह अर्धापूर, भोकर आणि मुदखेड तालुक्यात प्रामुख्याने केळी पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. नांदेड जिल्ह्यात साधारण 15 हजार हेक्टरवर केळी पिकाचे लागवड क्षेत्र आहे. दरम्यान, गतवर्षी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, उष्णतेमुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले होते. तर केळी पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने हजारो हेक्टरवरील केळी कापून फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. तसेच मध्यंतरी अवकाळी पाऊस, वादळी वर्यामुळे मध्यप्रेदश, बर्हणपुर, जळगाव, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात केळीचे मोठे नुकसान झाले होते. मात्र पहिल्यांदाच 2300 रुपयांचा विक्रमी भाव मिळाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचा याचा मोठा फायदा होत आहे.