पीक विमा घोटाळा: कागदपत्रे शेतकऱ्यांची, बँक अकाऊंट नंबर मात्र सेतू चालकाचा
Crop Insurance Scam : सेतू सुविधा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांच्या परस्पर पीकविमा काढल्याच्या धक्कादायक तक्रारी समोर येत असल्याने प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहे.
Crop Insurance Scam : जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा (Crop Insurance) लाभ मिळावा यासाठी सरकारने एक रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पिका विमा काढला आहे. मात्र, आता पीक विमा भरताना अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे समोर येत असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, असेच काही प्रकार एकामागून एक नांदेड जिल्ह्यात समोर येत आहे. सातबारा नांदेडचा (Nanded) अन् विमा बीड (Beed) जिल्ह्याचा काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी नांदेडमध्ये समोर आला होता. आता त्याच नांदेड जिल्ह्यात आणखी एक पीक विमा घोटाळ्याचा (Scam) प्रकार समोर आला आहे. सेतू सुविधा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांचा परस्पर पीक विमा काढल्याच्या धक्कादायक तक्रारी समोर येत असल्याने प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
नांदेडच्या कंधार तालुक्यात सेतू सुविधा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांचा परस्पर पीक विमा काढल्याच्या धक्कादायक तक्रारी आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि बँक अकाऊंट मात्र सेतू सुविधा केंद्र चालकांचे देण्यात आले आहेत. काही शेतकरी पीक विमा भरायला गेल्यावर त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. या प्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन तहसीलदारांनी चौकशी समिती गठीत केली आहे. शेतकऱ्यांची ही फसवणूक मोठ्या प्रमाणात झाली असल्याची शक्यता असून, या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. दरम्यान, एक रुपयात पीक विमा भरता येत असल्याने यावर्षी अशी फसवणूक वाढल्याचे बोलल्या जात आहे.
कशी झाली फसवणूक?
नांदेड जिल्ह्यात पीक विम्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एक रुपयात पीक विमा भरण्यात आल्याने हा घोटाळा करण्यात आल्याचा बोलले जात आहे. दरम्यान, कंधार तालुक्यात एका सेतू सुविधा केंद्र चालकाने देखील अशीच काही बदमाशी करत शेतकऱ्यांच्या नावावर विमा काढला आहे. पीक विमा भरताना या सेतू सुविधा केंद्र चालकाने वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे कागदपत्रे जोडली आहे. मात्र, याचवेळी त्याने अर्ज करताना बँक अकाऊंट मात्र स्वतःचं दिलं आहे. त्यामुळे विम्याची नुकसानभरपाई आली तरीही ती त्याच्याच खात्यात जमीन होईल. तर, यापूर्वी नांदेडच्या अर्धापुरातील शेत जमिनीचा विमा चक्क बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावावर काढला गेला होता.
इतर महत्वाच्या बातम्या:
पीक विमा घोटाळा! सातबारा नांदेडचा अन् विमा काढला बीडचा; शेतकऱ्यांमध्ये खळबळ