Chitra Wagh : भंडाऱ्यामध्ये 11 चिमुकले जळून खाक झाली, त्यावेळी राजीनामा मागितला होता का?; चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका
Chitra Wagh : विरोधकांनी स्वतःचे मानसिक आजारपण लोकांना दाखवले त्यांची मला कीव येते, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
नांदेड: येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्ण दगावल्याने राज्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेवरून राजकीय वातावरण देखील तापले असून,अजूनही नेत्यांचे नांदेडच्या रुग्णालयात एकामागून एक दौरे सुरूच आहे. त्यातच आता भाजपच्या महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील नांदेड शासकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी बोलतांना त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. भंडाऱ्यामध्ये 11 चिमुकले जळून खाक झाली, त्यावेळी तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा राजीनामा मागितला होता का?, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
नांदेडच्या घटनेतून विरोधक राजकीय सलाईनमधून सगळ्या राज्यात वणवा पेटवण्याचे काम करत असून, याचे वाईट वाटते. अडीच वर्ष तुमचे सरकार होते. इथे त्या ताई (सुप्रिया सुळे) मोठे मोठे भपकारे मारून गेल्या. विसरले का तिकडे भंडाऱ्यामध्ये 11 लहान मुले डॉक्टरांमुळे नाही तर शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाली होती. त्या मातांचे अश्रू नाही दिसले तुम्हाला, त्यावेळी का नाही मागितला आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा? राजेश टोपे तुमच्या जवळचे होते. मला या प्रश्नांची उत्तरे पाहिजे. सगळ्या शासकीय रुग्णालयाचे ऑडिट करू म्हणून गर्जना केली होती. किती हॉस्पिटलची केली. आमचं फेसबुकवरील सरकार नाही, अॅक्शन मोडचे आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
सरकार बदलल्यावर एका वर्षातच हे रुग्ण मृत झाले का?
नांदेड शासकीय रुग्णालयात आयसीयूमध्ये कधीच औषधांचा तुटवडा नव्हता. तीन वर्षाच्या रेकॉर्डवरून रुग्ण हे अत्यवस्थेत या ठिकाणी आणले जातात. खाजगीत उपचार संपल्यावर रुग्ण घरी घेऊन जा म्हणून सांगण्यात येते आणि त्यावेळी रुग्ण येथे आणले जातात. सरकार बदलल्यावर एका वर्षातच हे रुग्ण मृत झाले, असा विरोधी पक्ष सूर लावत आहेत. जे इथे येऊन भपारे सोडून गेले ते कोणी डॉक्टर नाहीत, माझ्या नंतरही काहीजण येणार आहेत. त्यांना मला सांगायचे तुम्ही येताना एका डॉक्टरला घेऊन या, तो तुम्हाला नीट सांगू शकेल. या रुग्णालयाची आकडेवारी पाहिली तर 2020 ते 2023 पर्यंत रोज 13 जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे एकच दिवशी असे झाले असं नाही. एकही माणूस दगावला तर आमच्यासाठी दुःखाचीच गोष्ट आहे. परंतु, ज्या पद्धतीने विरोधकांनी स्वतःचे मानसिक आजारपण लोकांना दाखवले त्यांची मला कीव येते, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
मुख्यमंत्री आरोग्य विभागाशी संवाद साधणार
आरोग्य हा सरकारचा पहिला प्राधान्यक्रम आहे. घटना घडल्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये आले. एका दिवसात 14 निर्णय घेतले गेले. यामध्ये काय त्रुटी आहे, त्यासंबंधी योग्य निर्णय घेतले गेले. 2800 पदांची भरती मॅटच्या स्टेमुळे थांबली होती, तोही मार्ग मोकळा झाला आहे. आज मुख्यमंत्री आरोग्य विभागाशी संवाद साधणार आहेत. त्यासोबतच सीएस, आरोग्य अधिकारी, विभागीय अधिकारी यांची समिती तयार करून आपल्या परिसरातील रुग्णालयाला भेटी देऊन काय कमी आहे याची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या असल्याचं चित्रा वाघ म्हणल्या आहेत.
विरोधकांकडून राज्यात वणवा पेटवण्याचे काम
दरम्यान यावेळी बोलतांना चित्रा वाघ म्हणाल्यात की, "सरकार बदलल्यावर एक वर्षातच हे रुग्ण मृत झाले, असा विरोधीपक्ष सूर लावत आहेत. त्यांना उत्तर देण्याची ही वेळ आणि जागाही नाही. तर, नांदेडच्या घटनेतून राजकीय सलाईन घेऊन विरोधकांकडून राज्यात वणवा पेटवण्याचे काम सुरू झाले असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्यात. नांदेडच्या विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एकाच दिवशी 24 रुग्णांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी रुग्णालयाला भेट दिली. दरम्यान यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
इतर महत्वाच्या बातम्या: