Agriculture News : नांदेडच्या मिरचीची 'लाली' कायम, परराज्यातून मोठी मागणी; उत्पादनातही वाढ
नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये (Dharmabad) रोज 500 थैल्या मिरचीची आवक होते. दरम्यान, सध्या मिरचीला चांगला भाव असल्यानं शेतकरी समाधानी आहेत.
Agriculture News : नांदेडच्या (Nanded) तिखट लाल मिरचीला (chīlli) पर राज्यातून मोठी मागणी आहे. अशातच यावर्षी मिरचीच्या उत्पादनात देखील वाढ झाली आहे. तसेच मिरचीला दरही चांगली मिळत आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) फायदा होतोय. नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये (Dharmabad) रोज 500 थैल्या मिरचीची आवक होते. दरम्यान, सध्या मिरचीला चांगला भाव असल्यानं शेतकरी समाधानी आहेत.
एकरी सरासरी चार ते पाच क्विंटल उत्पन्न
तेलंगणा, कर्नाटक राज्यातील व्यापारी नांदेडला येऊन मिरची खरेदी करत आहेत. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, बिलोली आणि धर्माबादमध्ये मोठ्या प्रमाणात लाल मिरचीची लागवड केली जाते. गावरान तिखट मिरचीला मोठी मागणी असते. ही मिरची पातळ, चवीला छान आणि पचायला चांगली असते. सेंद्रिय पद्धतीने मिरचीची लागवड केली जाते. यंदा तिन्ही तालुक्यात मिरचीला चांगला भाव मिळाला. एक एकरचा खर्च वीस ते पंचवीस हजार इतका येतो. एकरात सरासरी चार ते पाच क्विंटल उत्पन्न होते. यावर्षी प्रतीक्विंटल तीस हजार भाव मिळत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सध्या मिरचीची काढणी जवळपास पूर्ण झाली आहे. आता मिरची वाळवणे सुरु झाले आहे.
धर्माबादच्या गावरानी आणि तेजा या प्रसिद्ध मिरचीला मोठी मागणी
मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरील धर्माबादमध्ये यंदा पीक चांगले असल्याने आवक वाढली आहे. सध्या मिरची बाहेर ठिकाणी पाठवण्यावर भर दिला जात असल्याने दर गतवर्षीचे कायम असल्याचे चित्र आहे. दर कमी होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. त्यामुळे ग्राहकांना स्थिरदराचा चांगलाच 'ठसका' बसत आहे. धर्माबाद हे मिरची, हळद आणि धने पावडरच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी धर्माबादसह हैदराबाद, खम्मम, वरंगल, ब्याडगी (कर्नाटक), सोलापूर, गुलबर्गा या ठिकाणांवरुन मिरची विक्रीसाठी येते. धर्माबादची गावरानी आणि तेजा या प्रसिद्ध मिरच्या असून त्यांना अधिक मागणी असते.
मिरचीसह धन्याची आवकही वाढली
जानेवारीपासून लाल मिरची बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी मिरचीचे पीक चांगले आले आहे. धर्माबादमध्ये सध्या 400 ते 500 थैल्या रोज मिरची येत आहे. मार्चमध्ये आणखी आवक वाढण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे. तसेच धने एक हजार ते दोन हजार थैल्यांची रोज आवक होत आहे. धन्याचे उत्पादन वाढल्याने गतवर्षी पेक्षा यंदा दर कमी झाले आहेत. गतवर्षी 120 रुपये किलोवरुन 70 रुपये किलोवर आले आहेत. तेजा मिरचीला अधिक मागणी असून या मिरचीपासून तेल तयार करण्यात येते. तेलंगणातील खंम्मम येथे याची फॅक्ट्री आहे. त्यामुळे बाहेर पाठवण्यावर भर दिला जात आहे. उत्पादन वाढले तरी, मिरचीचे दर हे मागील वर्षाप्रमाणेच स्थिर आहेत. कमी होण्याची शक्यता कमी आहे, असे धर्माबाद येथील मिरचीचे व्यापारी तथा इंडस्ट्रीएल एरियाचे चेअरमन शेख अमिरोददीन शेख यांनी सांगितले.
सध्याचे मिरचीचे दर (क्विंटलमध्ये)
बेडगी - 35 ते 40 हजार, तेजा- 18 ते 20 हजार, गुंटूर - 18 ते 19 हजार, फटकी- 10 ते 12 हजार, ड्युन्युडिलक्स - 18 ते 19 हजार, गावरानी (धर्माबाद) - 25 ते 30 हजार, वंडरहार्ट- 19 ते 20 हजार तसेच हळद - 6 ते 7 हजार, धने 6 ते 8 हजार
तेलंगणना, आंध्र प्रदेशसह कर्नाटकमध्येही वाढली आवक
तेलंगणातील खंम्मम, आंध्र प्रदेशातील गुंटूर, वरंगलसह कर्नाटकमधील ब्याडगी येथील मिरचीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. याठिकाणीही सध्या आवक वाढली आहे. दररोज गुंटूरमध्ये एक लाख 40 हजार थैल्या, वरंगलमध्ये 75 हजार थैल्या, खंम्मममध्ये 40 हजार थैल्या, ब्याडगीमध्ये 70 हजार ते एक लाखपर्यंत थैल्यांची आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: