Vinod Tawde : पंकजा मुंडेंची तुम्हाला काळजी, मी मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का? विनोद तावडेंचे सूचक वक्तव्य
Vinod Tawde On Maharashtra CM : तीन राज्यांमध्ये भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी अनपेक्षित चेहरे दिल्यानंतर राज्यातही तीच भूमिका घेणार का अशी चर्चा असताना भाजपचे नेते विनोद तावडे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
नागपूर: महाराष्ट्राच्या राजकारणातून दूर असलेले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांना राज्यात परतण्याची इच्छा आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) राज्याच्या मुख्यमंत्री होऊ शकतील का असा प्रश्न विचारल्यानंतर विनोद तावडे यांनी प्रतिप्रश्न विचारत मी मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना भाजपच्या दे धक्का धोरणाप्रमाणे मुख्यमंत्री होण्याची आशा आहे का असाही प्रश्न पडतो.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे आज नागपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नागपुरात बोलताना त्यांनी अनेक सूचक वक्तव्यं केली. त्यामुळे मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये प्रस्थापित नेतृत्वाला फाटा देऊन नवीन नेतृत्वाला संधी देणारं भाजप महाराष्ट्रातही तसाच प्रयोग राबवेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. विनोद तावडे यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारताना पक्षाची नेत्यांकडून अपेक्षा, संसदेची सुरक्षा भेदल्याचे अलिकडील प्रकरण आणि पंकजा मुंडेंसह स्वतःच्या भवित्यव्याबद्दल काही सूचक वक्तव्यं केले.
मी मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का?
पंकजा मुंडे राज्याच्या मुख्यमंत्री होतील का असा प्रश्न विचारल्यानंतर विनोद तावडे गंमतीने म्हणाले की, तुम्हाला पंकजा मुंडे यांची खूप काळजी आहे. माझी काळजी नाही. तुम्हाला मी मुख्यमंत्री व्हावं असे वाटत नाही का?
विनोद तावडे यांनी केलेल्या या ताज्या वक्तव्यानंतर त्यांच्या मनात महाराष्ट्रात परतण्याची इच्छा आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान एका दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना तावडे यांनी आपल्याला केंद्रीय राजकारणात रस असल्याचं वक्तव्यही केलं.
पक्षाची कार्यकर्ते आणि नेत्यांकडून काय अपेक्षा आहे?
तीन राज्यात जे घडले ते पाहून अनेकांना असे वाटू शकते की प्रस्थापितांच्या जागी नवीन लोक का निवडले गेले. मात्र त्यामागे पक्षाचा विचार असा आहे की पक्षाने जे कामं दिली ती कामं करायची. मला ही स्पष्टता आधीच होती. इतरांना मात्र आता घडलेल्या प्रकारातून ती स्पष्टता आली असावी.
संसदेत जे घडले त्यामागे कोणाचा हात आहे?
संसदेत जे घडले त्याबद्दल लवकरच सत्य समोर येईल. त्यानंतर काही अग्रलेख मागे घेतले जातील. तशी आपल्याकडे परंपराच आहे अग्रलेख मागे घेण्याची.
ही बातमी वाचा :