Vinod Tawde: देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून विनोद तावडे 'भावी मुख्यमंत्री'? तावडे म्हणाले, नो महाराष्ट्र... ओन्ली राष्ट्र
Vinod Tawde Exclusive: राज्यातली भाजप संघटना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करत असल्याचं भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी म्हटलंय.
मुंबई: राज्याच्या राजकारणात मला सध्या तरी स्वारस्य नाही, मी केंद्रीय राजकारणात बरंच काही शिकायला मिळतंय, त्यामुळे मी तिकडेच खूश असल्याचं भाजप नेते विनोद तावडे यांनी सांगितलं. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांचं तिकीट कापल्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले, पण अधूनमधून ते राज्याच्या राजकारणात येणार असल्याच्या चर्चा असतात. तसेच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचं नाव चर्चेत असतं. या सर्व चर्चांवर विनोद तावडे यांनी पडदा टाकला असून मी केंद्राच्या राजकारणात काम करणार असल्याचं स्पष्ट केलं. एबीपी माझाने घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून विनोद तावडे महाराष्ट्राची धुरा सांभाळणार अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू असतात. त्यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर विनोद तावडे म्हणाले की, या गोष्टीमध्ये आजिबात तथ्य नाही. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. मला महाराष्ट्रात येण्यास रस नाही. मला केंद्रातल्या राजकारणात काम करायला आवडेल. केंद्राच्या राजकारणात शिकायला खूप मिळतंय. पण राज्याला ज्यावेळी गरज असेल त्यावेळी मी नक्की सहकार्य करेन.
Vinod Tawde Exclusive on Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस विरोधातील कंपूत नाही
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील कंपूमध्ये विनोद तावडे असल्याच्या काही बातम्या येतात. त्यावर बोलताना विनोद तावडे म्हणाले की, राज्याच्या भाजप संघटनेमध्ये दोन गट नाहीत. महाराष्ट्र भाजप संघटित असून एकदिलाने ते काम करत आहे.
एक मराठी माणूस 2024 सालच्या निवडणुकीत देशाच्या राजकारणात एक महत्त्वाची भूमिका बजावतोय हे निश्चितच अभिमानास्पद आहे. प्रमोद महाजन यांच्यानंतर मला हे काम करायला मिळतंय असं विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं.
राज्यात मविआची सत्ता घालवून एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने भाजपची सत्ता आणण्यामध्ये विनोद तावडेंची महत्त्वाची भूमिका असल्याचं बोललं जातंय. 2019 सालच्या निवडणुकीत विनोद तावडे यांचे तिकीट देवेंद्र फडणवीस यांनी कापल्याची चर्चा होती. नंतरच्या काळात विनोद तावडे यांची भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीसपदी वर्णी लागली आणि केंद्रातल्या मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या.
भाजप महाराष्ट्रातील 45 टक्के मतं मिळवणार
विनोद तावडे म्हणाले की, गेल्या लोकसभेवेळी जिंकलेल्या 303 जागा आणि इतर 60 जागांवर भाजपने लक्ष्य केंद्रीत केलं असून पुढील वर्षभर यावर काम केलं जाणार आहे. महाराष्ट्रात भाजप 44 ते 45 टक्के मतं मिळवण्यात यश मिळवेल.