Nagpur : अॅम्ब्युलन्समधील ऑक्सिजन सिलेंडर स्फोटाने बेसा हादरले; अनेकांच्या घराच्या खिडक्या तुटल्या, टीव्ही बिघडले
कळण्यापूर्वीच दुसऱ्या सिलेंडरचाही स्फोट झाला. पाठोपाठ झालेल्या दोन स्फोटांमुळे संपूर्ण परिसरात थरकाप उडाला. आकाशातील धुराचे लोट दुरवर दिसत होते. घटनेत पप्पू यांच्या गळा व पाठीला गंभीर दुखापत झाली.
Nagpur News : रिकाम्या प्लॉटवर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतील (Ambulance) दोन ऑक्सिजन सिलेंडर (oxygen cylinder blast) पाठोपाठ स्फोट झाल्याने बेसा (Besa) परिसर चांगलाच हादरला. विशेष म्हणजे, स्फोटाने रुग्णवाहिकेच्या चिंधड्या उडाल्या आणि नंतर आग लागली. यात बाजूलाच असलेल्या दुसऱ्या रुग्णवाहिकांचे मोठे नुकसान झाले. या स्फोटाची भीषणता इतकी होती की, बाजूला असलेले टाईल्सचे गोदाम, हॉटेल आणि इमारतींचे नुकसान झाले. यात एकाला दुखापत झाली. यात परिसरातील अनेकांच्या घरातील खिडक्या तुटल्या आणि टीव्ही बिघडले.
पप्पू त्रिपाठी असे जखमीचे नाव आहे. त्यांचा रुग्णवाहिकेचा व्यवसाय आहे. त्याचे भाऊ प्रमोद त्रिपाठी (वय 30) सुद्धा त्यांना व्यवसायात मदत करतात. हायटेक रुग्णावहिका असलेल्या दोन टाटा विंगर श्रीरामनगरात पार्क करुन ठेवल्या होत्या. पप्पू त्रिपाठी हे रुग्णवाहिकेजवळ असताना अचानक ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. त्यासोबतच रुग्णवाहिकेने पेट घेतला. काही कळण्यापूर्वीच दुसऱ्या सिलेंडरचाही स्फोट झाला. पाठोपाठ झालेल्या दोन स्फोटांमुळे संपूर्ण परिसरात थरकाप उडाला. दूरपर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू येण्यासह रुग्णवाहिकांना आगीने कवेत घेतले. आकाशातील धुराचे लोट दूरवर दिसत होते. घटनेत पप्पू यांच्या गळा आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यांना सुरक्षित बाहेर काढून मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले.
हॉटेल, गोदाम, इमारतींना फटका
सिलेंडरच्या स्फोटामुळे 50 फूट अंतरावर अमित देखमुख यांच्या मालकीचे असलेल्या प्रमिल प्रकाश हॉटेलच्या छताची पीओपी कोसळली. खिडक्या तुटल्या, एसी निखळून पडले, टीव्ही पंद पडले. इमारतीचे सर्वच सीसीटीव्ही कॅमेरे तुटले. याशिवाय चुन्नीलाल पवार यांच्या मालकीच्या तेजस्वीनी मार्बल अॅण्ड हार्डवेअरच्या गोदामच्या मागेच दोन्ही रुग्णवाहिका उभ्या होत्या. गोदामावरील टिनाचे शेडला असलेल्या टीन अगदी उडून दूरवर जाऊन पडल्या. सुदैवाने त्यामुळे कोणाला इजा झाली नाही. गोदामात असलेल्या टाईल्सचा अगदी चुराडा झाला. हार्डवेअरच्या साहित्याचेही नुकसान झाले.
अनेकांच्या घराच्या खिडक्या तुटल्या, टीव्ही बिघडले
तसेच जवळच राहणारे सुरेश जयस्वाल यांच्या घरच्या खिडक्या, दार तुटले, टीव्ही बिघडले. राजेंद्र जयस्वाल यांच्याकडील तीन खिडक्याही तुटल्या. अन्य काहींकडील टीव्ही आवाजामुळे बिघडल्याचा दावा स्थानिक रहिवाशांकडून केला जात आहे. सिलेंडर स्फोटाने कानठळ्या बसवणारे आवाज झाल्याने परिसरात खळबळ उडाली घटनेनंतर तातडीने अग्नीशमन दलाला सूचना देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान बंबासह दाखल झाले. रुग्णवाहिकेतून ज्वाळा निघत होत्या. तातडीने पाण्याचा मारा सुरु करण्यात आला. सुमारे सव्वा ते दीड तासात आगीवर नियंत्रण मिळाले पण तोपर्यंत रुग्णवाहिकांच्या आतील बहुतेकच साहित्य भस्मसात झाले होते.
ही बातमी देखील वाचा