Nagpur Nag River: नाग नदीचा प्रदूषणाचा विळखा सुटणार; पुनरूज्जीवन प्रकल्पाला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Nag River Rejuvenation: नागपुरमधील ऐतिहासिक नाग नदी प्रदुषणाच्या विळख्यातून मुक्त होणार आहे. केंद्र सरकारने नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
Nagpur News : अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या नागपूर (Nagpur) शहरातील ऐतिहासिक नाग नदीच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाला (Nag River Rejuvenation) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नागपूर महानगरपालिका (NMC) हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील जवळपास 500 किमी सिवरलाईन नेटवर्कचे नूतनीकरण करण्यात येईल. या प्रकल्पाचा एकूण खर्च 1927 कोटी रुपये एवढा आहे. प्रकल्पामध्ये केंद्र शासन (Central Government), राज्य शासन (State Government) व नागपूर महानगरपालिका (nagpur municipal corporation) यांचा अनुक्रमे 60:25:15 या प्रमाणात हिस्सा आहे. केंद्र शासनाकडून 115.22 कोटी, राज्य शासनाकडून 507.36 कोटी व मनपाकडून 15 टक्के म्हणजे 304.41 कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1,31,861 घरांना सीवर नेटवर्कमध्ये जोडण्यात येईल. प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेकडून केली जाणार आहे. यासाठी नदीत येणारे सांडपाणी अडविणे किंवा ते वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करणे, प्रसाधनगृह आदी कामे प्रकल्पांतर्गत होणार आहेत. नागपुरकरांसाठी महत्वपूर्ण ठरणारा आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प आहे.
प्रकल्पातील प्रमुख मुद्दे
- नाग नदीचे उगम अंबाझरी तलावातून होतो.
- नाग नदीची एकूण लांबी 68 किमी आहे.
- शहरी भागात नाग नदीची लांबी 15.68 किमी आहे.
- नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) 92 एमएलडी क्षमता असलेले तयार करण्यात येतील.
- तर 'STP' (10 एमएलडी) अद्ययावत (अपग्रेडेशन) करण्यात येईल.
- नविन 4 पम्पिंग स्टेशन
- प्रकल्पामध्ये 107 'मॅनहोल' वळण (मॅनहोल डायव्हर्सन)
- 48.78 किमी इंटरसेप्टर सीवर (नाग नदी व पिवळी नदी वर)
- उत्तर झोन मध्ये 247.9 किमी सीवर लाईन तसेच मध्य झोन मध्ये 211.60 किमी सीवर लाईन बदलण्यात येतील.
- प्रकल्प झाल्यानंतर नाग नदी, बोरनाला आणि पिवळी नदीचा पाण्याची गुणवत्ता सुधरेल.
- प्रकल्प वर्ष 2049 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- शहराचा स्वच्छतेमध्ये सुधारणा होईल.
- नदयांच्या पाण्यात प्रदुषणाचे स्तर कमी होतील.
प्रदूषण रोखण्यासाठी 'चला जाणूया नदी' उपक्रम
नदी प्रदूषणाबाबत ( Rivers Pollution ) नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी नागपूरमधील नाग आणि आम नदीच्या जलसंचयन क्षेत्रातील (Catchment areas of rivers) गावांमध्ये आमसभा घेण्यात येणार आहे. 'चला जाणूया नदी' या अभियानाअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. याच्याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय समितीची पहिली बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांचा सूचना दिल्या. या अभियाना अंतर्गत नद्या प्रदुषणमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने या अभियानाअंतर्गत नागपूर जिल्ह्यासाठी नाग नदी (Nag river) आणि आम नदी निवड केली आहे.
ही बातमी देखील वाचा