दोन बोटांनी सहज उचलता येणारी सात किलोंची सायकल; किंमत ऐकून थक्क व्हाल
तैवान वरून आलेली विशेष कार्बन फायबरची ही "प्रोपेल एडव्हान्स SL वन" म्हणजेच सुपर लाईट सायकल 5 लाख 70 हजार रुपयांची आहे. तसेच या सायकलचं वजन अवघं सात किलो आहे.
नागपूर : आजवर अनेक महागड्या दुचाकी, चारचाकी वाहनं तुम्ही पाहिली असतील. काहींमध्ये तर तुम्ही प्रवासही केली असेल. मात्र, नागपुरातील संदीप जवंजाळ यांच्याकडे महागड्या दुचाकी, चारचाकी वाहनांसह एक अत्यंत खास सायकल ही आहे. आणि ती ही 5 लाख 70 हजारांची. एवढी महाग सायकल आहे ही तेवढीच खास. विशेष कार्बन फायबरची ही सुपर लाईट सायकल अवघ्या दोन बोटांनी सहज उचलता येते. आता एवढी महाग आणि खास सायकल जवंजाळ यांच्या घरी राहते ही त्याच थाटात. होय... बरोबर ऐकताय तुम्ही. सायकल संदीप आणि कुटुंबियांसह त्यांच्या घरात राहते. बेडरूम मध्ये पार्क होते. तर चला आपण जाणून घेऊयात या लाखामोलाच्या सायकलबाबत...
विदर्भातील प्रसिद्ध बेरार फायनान्सचे एक्सीक्युटीव्ह डायरेक्टर असलेल्या संदीप यांच्या घरी अनेक आलीशान चारचाकी वाहनं आहेत. मात्र, यशस्वी व्यावसायिक असलेले संदीप जवंजाळ यांना लहानपणापासूनच सायकलिंगची आवड आहे. नित्यनियमाने लॉन्ग डिस्टन्स सायकलिंगनेच त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. लहानपणापासून अनेक सायकली वापरलेल्या संदीप यांच्या नव्या सायकलची किंमत ऐकल्यावर मात्र तुम्हाला धक्काच बसेल. तैवान वरून आलेली विशेष कार्बन फायबरची ही "प्रोपेल एडव्हान्स SL वन" म्हणजेच सुपर लाईट सायकल 5 लाख 70 हजार रुपयांची आहे.
प्रोपेल एडव्हान्स SL (सुपर लाईट) वन सायकलची वैशिष्ट्ये :
- संपूर्ण बॉडी कार्बन फायबर बॉडी
- वजन अवघं सात किलो
- सायकल तयार करण्यासाठी "एयरो डायनॅमिक" तंत्राचा वापर
- ट्युबलेस टायर विथ ऑटो पंक्चर रिपेअर
- खास ट्युब्लेस टायरमध्ये 125 पीएसआय म्हणजेच बाईकच्या टायर पेक्षा चारपट हवा राहते.
- सुपर लाईट सायकलमध्ये खास अशी सेन्सर बेस्ड गियर सिस्टीम लागली आहे.
- मागच्या चाकाला 10 आणि समोरच्या चाकाला 2 असे एकूण 12 गियर्स
- प्रोफेशनल सायकल पटू या सायकलवर सहज 60 ते 70 किमी प्रति तासाची गती
- सिंगल मोल्ड सायकल. म्हणजेच, सायकलमध्ये कुठेच जॉईन्ट नाहीत.
बालपणापासून सायकलिंग करणारे संदीप सुरुवातीला सामान्य सायकल वापरायचे. हळूहळू सायकलिंगची त्यांची आवड आणि लॉन्ग डिस्टन्स सायकलिंगचे त्यांची क्षमता वाढत गेल्याने त्यांनी प्रोफेशनल सायकल वापरायला सुरुवात केली. ट्रेक वन पॉईंट वन ही अमेरिकेची सायकल अनेक वर्ष वापरल्यानंतर आता त्यांनी जास्त फीचर्सची तैवानमधील "प्रोपेल एडव्हान्स SL (सुपर लाईट) वन" सायकल खरेदी केली.
गेल्या एक महिन्यापासून संदीप ही महागडी सायकल वापरत असून रोज किमान 25 किलोमीटर आणि विकेंडला तर सोलो राईड करत नागपूरच्या अवतीभवती 150 किलोमीटर पर्यंत सायकलिंग करून येतात. व्यस्त जीवनशैलीत फिटनेस आणि व्यावसायिक ताणतणावातून मुक्तीच्या दृष्टीनं सायकलिंगचा आजवर खूप फायदा झाल्याचा त्यांचा अनुभव आहे.
आता जीवनात एवढे काही देणारी सायकलिंग आणि एवढी महाग सायकल हे दोन्ही संदीपच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. ते आपल्या सायकलवर जीवापाड प्रेम करतात आणि त्यामुळेच त्यांच्या महागड्या कार जरी इमारतीच्या खाली पार्किंगमध्ये असल्या तरी त्यांची सायकल मात्र कुटुंबियांसह घरात राहते. अगदी संदीपच्या बेडरूममध्ये ही खास सायकल पार्क केली जाते.