नागपुरातील विकोच्या कारखान्याला लागलेली आग आटोक्यात, कुलिंगचे काम सुरू
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसी परिसरात विको कंपनीला मोठी आग लागली आहे.
नागपूर : देशातील हर्बल कॉस्मेटीक्स क्षेत्रातील एक मोठा नाव असलेल्या विको प्रयोगशाळेच्याच्या नागपूर युनिटला लागलेल्या भीषण आगीत कंपनीचा मोठा नुकसान झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसी परिसरात विकोचा मोठा कारखाना आहे. याच कारखान्यात काल रात्री आग लागली. सुरुवातीला मर्यादित स्वरूप असलेली आग पाहता पाहता भीषण झाली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मते या आगीत कारखान्याचा 70 टक्के भाग भस्मसात झाला आहे.
विकोच्या नागपूरस्थित कारखान्याची ही दृश्ये येथे लागलेल्या आगीची भयावहता सांगण्यासाठी पुरेशी आहेत. आगीच्या मोठ्या ज्वाळा.... धुराचा लोट.... आगीमुळे निर्माण झालेल्या प्रचंड तापमानामुळे वितळून खाली पडलेले लोखंडी शेड्स आणि कारखान्याच्या इमारतीचा काँक्रीटचा स्लॅब खाली कोसळला. देशातील हर्बल कॉस्मेटिक्सच्या क्षेत्रात मोठा नाव असलेल्या विकोच्या कारखान्याला काल रात्री आग लागली. दहा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास आगीची कल्पना आल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला सूचना दिली. सुरुवातीला मर्यादित स्वरूपात असलेली आग अवघ्या काही तासात विक्राळ स्वरूपाची झाली आणि त्या आगीने कारखान्याच्या संपूर्ण परिसराला आपल्या कवेत घेतले.
नागपूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या सुरुवातीला घटनास्थळी गेल्या होत्या. मात्र, नंतर आग वाढत गेल्यामुळे आणखी चार गाड्या बोलावण्यात आल्या. त्या शिवाय शेजारील हिंगणा, वाडी आणि कळमेश्वर परिसरातून ही आणखी चार गाडयांना बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मते आग लागली तेव्हा कारखान्याच्या विविध भागात हर्बल कॉस्मेटिक्स आणि आयुर्वेदिक औषधी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर परिसरात होता. त्यामध्ये ही विविध कॉस्मेटिक्समध्ये लागणारा अल्कोहोल आणि वॅक्स म्हणजेच मेण सर्वात जास्त प्रमाणात होता. हे दोन्ही पदार्थ हायड्रोकार्बन श्रेणीतले असल्याने त्यांच्यावर पाण्याची फवारणी केल्यानंतर ही आग नियंत्रणात येत नव्हती. अशा हायड्रोकार्बनची आग नियंत्रणात आणण्यासाठी खास फोम ची फवारणी आवश्यक असते. मात्र, विको लॅबोरेटरीजच्या कारखान्यात तसे अग्निशमन करणारे फोम आवश्यक प्रमाणात उपलब्ध नव्हते. तसेच ज्या एमआयडीसी परिसरात विको लॅबोरेटरीजचा कारखाना आहे. त्या भागातले एमआयडीसीचे हायड्रेन्ट ( पाण्याचे पाइप्स ) वेळेत सुरु न झाल्याने आग विझवण्यासाठी गेलेल्या गाडया एकदा रिकाम्या झाल्यानंतर ते पुन्हा भरण्यासाठी बराच वेळ जात असल्याने आग नियंत्रणात आण्यास बराच वेळ लागला.
विको लॅबोरेटरीज 1952 मध्ये स्थापन झालेल्या विको ग्रुपची प्रमुख उत्पादन कंपनी आहे. नागपुरात विको लॅबोरेटरीजच्या युनिटची स्थापना 1986 मध्ये झाली. नागपूर जवळच्या हिंगणा एमआयडीसी परिसरात नीलडोह जवळ विको लॅबोरेटरीजचा अत्याधुनिक युनिट आहे. नागपूरचा युनिट 3 लाख 60 हजार वर्ग फोट क्षेत्रात विस्तारलेला असून एक तृतीयांश भाग फक्त मॅन्युफॅक्चरींग युनिट आहे. तर उर्वरित क्षेत्रात पेकेजिंग युनिट, गोदाम, प्रशासकीय कार्यालय असे विविध भाग आहेत.
विको लॅबोरेटरीज नागपुरात प्रामुख्याने विको वज्रदंती टूथपेस्ट, विको वज्रदंती मंजन, विको नारायणी पेन रिलीफ क्रीम, विको टर्मरिक स्किन क्रीम, विको शेविंग क्रीम असे पदार्थ बनवते. कारखान्यात एका शिफ्टमध्ये शेकडो कर्मचारी कामाला असतात. मात्र काल रात्रपाळीत आग लागल्यामुळे त्या शिफ्ट मध्ये कमी संख्येने कर्मचारी होते. त्यामुळे जीवित हानी टळली. सकाळी 10 वाजेपर्यंत आग बऱ्याच अंशी नियंत्रणात आली होती. मात्र तरीही अनेक ठिकाणी आग धुमसत आहे आणि अधून मधून आगीच्या ज्वाळा उफाळून येतात. त्यामुळे आग संपूर्णपणे विझण्यासाठी आणखी अनेक तासांचा कालावधी लागण्याचं शक्यता आहे. आग लागण्याचे कारण काय हे जरी अजूनपर्यंत स्पष्ट झाले नसले तरी या आगीमुळे राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या उत्कृष्ट उत्पादनांनी नावलौकिकास आलेल्या विको लॅबोरेटरीजचा मोठे नुकसान झाला आहे.