Coal Theft : ऊर्जा मंत्र्यांच्या नागपुरातच कोळसा खाणीतून वीज प्रकल्पांकडे जाणाऱ्या कोळशाची चोरी
Coal Theft : एकीकडे कोळशाअभावी भारनियमनाचे संकट असताना दुसरीकडे नागपुरातील कोळशा खाणीतून वीज प्रकल्पांकडे जाणाऱ्या कोळशाची चोरी उघड. कमी वजनाचा आणि ओला कोळसा वीज प्रकल्पांच्या माथी मारला जातो?
नागपूर : सध्या कोळसा टंचाईमुळे औष्णिक वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाही. त्यामुळे राज्यात भारनियमन करावं लागत असल्याचं ऊर्जा विभागाचं म्हणणं आहे. काल (11 मे) मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळेला भारनियमनाचा फटका बसल्याचंही समोर आले होते. मात्र, दुसऱ्या बाजूला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या नागपूर जिल्ह्यातच कोळसा खाणीतून वीज प्रकल्पांमध्ये जाणाऱ्या कोळशाची उघड चोरी होत असल्याचं समोर आलं आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील उमरेड, मकरधोकडा आणि गोकुळ अशा अनेक महत्त्वाच्या कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणीतून रोज हजारो टन कोळसा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील औष्णिक वीज प्रकल्पांना पाठवला जातो. ट्रकच्या माध्यमातून या कोळशाची वाहतूक केली जाते. मात्र, वीज प्रकल्पांमध्ये पोहोचण्याच्या आधीच बराच गोलमाल करुन कोळसा चोरीचे लाखों रुपयांचे गैरव्यवहार सुरु असल्याचे समोर आलं आहे.
उमरेड तालुक्यातील सिर्सी गावाजवळच्या काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले असून त्याच्या माध्यमातून काही खाजगी व्यापारी कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांशी साटंलोटं करुन कोळसा चोरी करत असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. स्थानिक नागरिक अखिल रोडेचा आरोप आहे की उमरेड तालुक्यातील सिर्सी गावाजवळील एका बियर बारसमोर काही कोळशाचे ट्रक नियमितपणे थांबतात आणि त्या ठिकाणी ट्रकमध्ये लादलेला काही कोळसा उतरवला जातो. काही खाजगी व्यापारी ट्रक चालकांकडून तो कोळसा तीन रुपये किलोने खरेदी करतात. पुढे खाजगी व्यापारी चोरीने खरेदी केलेला तोच कोळसा 16 रुपये किलो दराने बाजारात विकतात.
दरम्यान, चोरट्या मार्गाने केलेल्या या विक्रीमुळे कोळशाचा कमी होणारं वजन भरुन काढण्यासाठी ट्रक चालक त्याच ठिकाणी कोळशाच्या ट्रकवर पाणी फवारुन ओला कोळसा वीज प्रकल्पांमध्ये घेऊन जातात. या चोरट्या व्यापारामुळे वीज प्रकल्पांना कमी कोळसा मिळतो, शिवाय ओला असल्याने त्याची ज्वलनक्षमता कमी असते आणि त्यामुळे वीज निर्मितीवर त्याचा विपरीत परिणाम होतो.
कोळशाचा असा चोरटा व्यापार चालणाऱ्या गावांमध्ये अनावश्यक प्रदूषण पसरत असल्याचा आरोपही सिर्सी गावातील नागरिकांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या संदर्भात गावकऱ्यांनी उमरेड पोलीस स्टेशनला माहिती देऊनही पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. कोळशाच्या या चोरट्या व्यापारात काही परप्रांतीय नागरिक सहभागी असून ते ग्रामीण भागात दहशतीचा वातावरण निर्माण करत असल्याचा आरोपही होत आहे.