Sudhir Mungantiwar: 'काही मोजके अधिकारी मविआसाठी काम करतायत', भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांचा गंभीर आरोप
Sudhir Mungantiwar: मंत्रीमंडळ बैठकीत देखील त्यांनी याबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. काही अधिकारी विरोधकांच्या सांगण्यावरून काम करत आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांनी दम द्यायला हवा असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
नागपूर: भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी काही अधिकाऱ्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. काही अधिकारी आचारसंहितेची वाट पाहत विषय रेंगाळत ठेवत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. मंत्रीमंडळ बैठकीत देखील त्यांनी याबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. काही अधिकारी विरोधकांच्या सांगण्यावरून काम करत आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांनी दम द्यायला हवा असंही मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी म्हटलं आहे.
काय म्हणालेत सुधीर मुनगंटीवार?
काही अधिकारी काही महत्त्वाचे विषय आचारसंहितेपर्यंत तो कसा टाळता येईल, असा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला काही निर्णय देखील ते पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतात, महत्वाचा विषय आचारसंहिता पर्यंत कसा टळतील यांसाठी प्रयत्न करत आहे. काही मोजके अधिकारी नकारात्मक आहे, म्हणूनच त्यांना चेतावणी देण्याची गरज होती. असं वागाल तर याद राखा यावेळी देखील सरकार आमचंच येईल. जनहितासाठी जर तुम्ही आचारसंहितेची वाट पाहत असाल तर ही बाब योग्य नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं की लोकहितासाठी आचार संहितेचे वाट पाहण्याची गरज नाही, असंही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी म्हटलं आहे.
अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवर आणि नाना पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
दृष्ट बुद्धीचा बलात्कारी होता. त्याने पोलिसांवर हल्ला केल्यावर त्याच्यावर सहानुभूती दाखविण्याचा प्रयत्न विरोधक करत आहे, प्रत्यक्ष उपस्थित नसताना सहानुभूती व्यक्त करतात हे आश्चर्यकारक आहे. आधी फाशी द्या म्हणायचे आणि आता तेच लोक पोलिसांच्या जिवावर उठला त्याच्यावर सहानुभूती दाखवत आहेत. पोलिसांवर विश्वास ठेवायचा नाही का, पोलीस राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. मतांसाठी विरोधक काय करतील याचा भरोसा नाही असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला आहे.
बदलापूर घटनेवरून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संघावर हल्लाबोल करत संघाशी संबंधित लोक या प्रकरणात सामील आहेत, त्यामुळे त्यांना सरकार संरक्षण देत असल्याचे सांगितले. नाना पटोलेंच्या आरोपांवर मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी पलटवार केला आहे. मुनगंटीवार म्हणाले की, नानांना मुख्यमंत्री होण्याची घाई आहे, त्यामुळेच ते अशा गोष्टी बोलत आहेत.
यावेळी बदलपूर प्रकरणातील मुख्य आरोपींच्या एन्काउंटरबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, पोलिसांवर हल्ला करणारा तो आरोपी होता पण, आता विरोधक त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहेत. तेथे काय घडले हे न कळताच अशा गोष्टी आश्चर्यकारक आहेत.
ते पुढे म्हणाले, "आधी विरोधक आरोपींना फाशी देण्याची मागणी करत होते, तर आता ते एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित करत आहेत. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीबद्दल ते सहानुभूती दाखवत आहेत. त्यांचा ना पोलिसांवर विश्वास आहे ना इतर कोणावर. सांगता येत नाही. ते मतांसाठी काय करेल." नाना पटोले यांच्या संघाबाबतच्या वक्तव्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, "नाना लोकप्रियतेसाठी संघावर वारंवार असे आरोप करत आहेत. त्यांना मुख्यमंत्री होण्याची घाई आहे, त्यामुळे ते चर्चेत राहण्यासाठी वक्तव्ये करत आहेत. "
सिद्धिविनायक मंदिरातील लाडूंच्या पाकिटात उंदराची पिल्लं, काय म्हणाले मुनगंटीवार?
सिद्धीविनायक प्रसादाच्या पाकिटांवर उंदराची पिल्लं दिसत आहेत. लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदराने पिल्लं दिली आहेत. प्रसादाचे लाडू उंदरांनी कुरतडल्याचाही आरोप आता होत आहे. दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने हे आरोप फेटाळले आहेत. याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या बाबतीत जो व्हिडिओ प्रसारित होत आहे त्याची चौकशी सरकार करेल.