(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Ponkshe : बरं झालं शिवरायांच्या काळात गांधी नव्हते, अन्यथा .... : शरद पोंक्षे
Sharad Ponkshe On Shivrajyabhishek Din: 'घर वापसी'चे विचार हे संघाचे किंवा भाजपचे नाहीत, शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांसह अनेकांना हिंदू धर्मात परत आणलं होतं असं ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले.
नागपूर : जेष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी नागपुरात केलेल्या एका वक्तव्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. बरं झालं शिवाजी महाजारांच्या काळात गांधीजी नव्हते, नाहीतर महाराज अहिंसक झाले असते. अफजलखानाला भेटायला निशस्त्र गेले असते आणि संपले असते असं वक्तव्य शरद पोंक्षे यांनी केलं. नागपुरात शिवराज्याभिषेक दिनी (Shivrajyabhishek Din) आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अहिंसा परमो धर्म असे म्हणणाऱ्या महात्मा गांधींचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाला नव्हता हे आपलं नशीब आहे. नाहीतर आपले महाराज महात्मा गांधीचा आदर ठेवत अहिंसक झाले असते आणि अफजल खानाला भेटायला निशस्त्र गेले असते. त्यामध्ये महाराजच संपले असते असं वादग्रस्त वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलं आहे.
संभाजी ब्रिगेडवरही हल्लाबोल
शरद पोंक्षे म्हणाले की, अफजल खानचा वध करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला अनेक पत्र लिहिले. त्यात नमती भूमिका घेऊन त्यांनी अफजलखानला फसवलं आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलं. मग श्रीकृष्णाच्या नीतीने त्याचा वध केलं. बरं झालं त्या काळात संभाजी ब्रिगेडसारख्या दरिद्री संस्था आणि ब्रिगेडी लोक नव्हते. नाही तर त्यांनी महाराजांवर टीकेची झोड उठवत अफजल खान महाराष्ट्रात एवढी नासधूस करताना, मंदिर नष्ट करताना महाराज प्रतापगडावर बसून राहिले अशी टीका केली असती.
काय म्हणाले शरद पोंक्षे?
छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या किल्ल्यातून खाली उतरतील यासाठी अफजलखानाने अनेक प्रकारचे प्रयत्न केले. तुळजाभवानीची मूर्ती फोडली, पंढरपूरमध्ये नासधूस केली. मंदिरात गो हत्या करून पुजाऱ्यांना गोमास खायला लावले, मात्र तरीही छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या खाली उतरले नाही.
बरं झालं तेव्हा ब्रिगेडी लोक आणि अशा दरिद्री संस्था त्या काळात नव्हत्या. नाही तर हे पाहून त्यांनी शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या असत्या.
अफजलखानाने महाराजांना एकटं आणि निशस्त्र बोलावलं होतं. मात्र छत्रपती शिवाजी महाराज एकटेही गेले नाही आणि निशस्त्र ही गेले नाही. ते शस्त्र घेऊन गेले. अहिंसा परमो धर्म असे म्हणणाऱ्या महात्मा गांधींचा त्या काळात जन्म झाला नाही हे आपलं नशीब आहे. नाहीतर आपले महाराज एवढे सज्जन होते, संतांचा आदर राखणारे होते की तेव्हा गांधी असते तर महाराजांनी त्यांचा आदर ठेवत अहिंसक झाले असते. अफजल खानाला भेटायला निशस्त्र गेले असते, तर महाराज संपले असते.
महाराज नियोजन करून गेले. जिजाऊंचा आशीर्वाद घेतला, ब्राह्मणाला साष्टांग नमस्कार केला आणि मग गडाच्या खाली उतरले. खाली येऊन एका ब्राह्मणाची हत्याही केली आहे, याला म्हणतात युद्धनीती. मग अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून त्याला संपवले. राजा कसा असावा तर असा असावा.
'घर वापसी'ची सुरूवात शिवाजी महाराजांनी केली
घर वापसी हे भाजप आणि संघाचे विचार नाहीत. घर वापसीची सुरुवात ही भाजप आणि संघानं केलेली नाही, तर त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी केल्याचं मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी फक्त नेताजी पालकरच नाही तर हजारो लोकांना महाराजांनी पर धर्मातून हिंदू धर्मात आणले आहे असंही ते म्हणाले.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या जयंतीदिनी नागपुरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना शरद पोंक्षे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. जर शिवाजी महाराज निधर्मी होते, सेक्युलर होते, पुरोगामी होते, तर परधर्मात गेलेल्याना परत हिंदू धर्मात आणण्याची महाराजांना काय गरज होती असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राम आणि कृष्ण यांचे संस्कार असलेल्या शिवाजी महाराजांना आपण निधर्मी म्हणतो, त्यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता असे म्हणतो. ते हिंदुत्वासाठी लढलेच नाही असे म्हणतो, हे दुर्दैवी असल्याचेही पोंक्षे म्हणाले.
कधी श्रीराम अमलात आणायचा आणि कधी श्रीकृष्ण अमलात आणायचा हे छत्रपती शिवाजी महाराजांना अचूक माहीत होतं. शिवाजी महाराज कधीही अहिंसा परमोधर्म एवढ्या अर्धवट मंत्राचे पाईक नव्हते. धर्माच्या रक्षणासाठी हातामध्ये शस्त्र घेणं हे अहिंसापेक्षाही मोठा आणि श्रेष्ठ धर्म आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांना पुरेपूर माहीत होतं असं शरद पोंक्षे म्हणाले.
ही बातमी वाचा :