मला पुन्हा बेळगाव जेलमध्ये पाठवा, गडकरींच्या कार्यालयात फोन करुन धमकी देणाऱ्या जयेश पुजारीची हायकोर्टात याचिका
Jayesh Pujari PIL : नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करु 10 कोटी रुपयांची खंडणी मागणारा आरोपी जयेश उर्फ शाकीर पुजारीने आपल्याला परत बेळगाव कारागृहात पाठवावे यासाठी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
Jayesh Pujari PIL : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयात फोन करु 10 कोटी रुपयांची खंडणी (Extortion) मागणारा आरोपी जयेश उर्फ शाकीर पुजारी (Jayesh Pujari) याने आपल्याला परत बेळगाव कारागृहात (Belgaon Jail) पाठवावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (Nagpur Bench of Bombay High Court) याचिका दाखल केली आहे. नागपूर कारागृहात (Nagpur Jail) आपल्याला जीवाला धोका असल्याचे जयेश उर्फ शाकीरने आपल्या याचिकेत म्हटले आहे.
बेळगाव कारागृहात त्याला ऐशोआरामाच्या सुविधा मिळत असल्याने जयेश उर्फ शाकीरने बेळगाव कारागृहात स्थलांतर करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे.
एनआयएने मागच्याच आठवड्यात जयेश उर्फ शकिरची चौकशी केली होती. जयेश हा बेळगाव कारागृहात कैद असलेल्या दहशतवादी संघटनांचे म्होरके अकबर पाशा, कॅप्टन नसीर आणि फहद कोया रशीद मालाबारी संपर्कात होता. त्यांच्या सांगण्यावरुनच नितीन गडकरी यांच्या कार्यालयाला धमकीचे फोन करत होता.
जयेश पुजारीचे पीएफआयशी संबंध
नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकी देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी असल्याचे तपासात उघड झालं आहे. त्यामुळे त्याच्यावर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत म्हणजेच यूएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवला जाणार आहे. याप्रकरणी आधीच नागपुरात दोन गुन्ह्यांची नोंद असताना पोलिसांनी या प्रकरणात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
14 जानेवारी आणि 21 मार्चला केले होते धमकीचे कॉल
दरम्यान, बेळगावच्या तुरुंगात कैद असताना 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीने फोन केला होता. यावेळी त्याने पहिल्यांदा 100 कोटी आणि दुसऱ्यांदा 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्यास नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी जयेश पुजारीने दिली होती. या प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी याने बऱ्याच आधी धर्म परिवर्तन केले असून धर्म परिवर्तनानंतरचे त्याचे नाव शाकीर असल्याची माहिती एबीपी माझाने समोर आणली होती. तसेच त्याचे काही कट्टरपंथी संघटनांशी संबंध असल्याचेही समोर आणले होते.
हेही वाचा