मिशी कापल्याने पोलीस तक्रार करणाऱ्या 'त्या' ग्राहकाची दाढी, केस न कापण्याचा नाभिक संघटनेचा निर्णय
ग्रामीण नाभिक संघटनेने याप्रकरणी आंदोलनाचाही इशारा देखील दिला आहे. किरण ठाकूरने यापूर्वीही अनेकदा मिशी कापली होती.
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कन्हानमधील मिशी कापल्यामुळे किरण ठाकूर या ग्राहकाने न्हाव्याविरोधात पोलीस तक्रार केली होती. त्यामुळे किरणची यापुढे दाढी, केस न कापण्याचा निर्णय ग्रामीण नाभिक संघटनेने घेतला आहे. त्यामुळे मिशी कापल्यानंतर पोलीस स्टेशनची पायरी चढणाऱ्या किरण ठाकूरला यापुढे दाढी आणि केस कापण्यासाठी वणवण फिरावे लागण्याची शक्यता आहे.
ग्रामीण नाभिक संघटनेने याप्रकरणी आंदोलनाचाही इशारा देखील दिला आहे. किरण ठाकूरने यापूर्वीही अनेकदा मिशी कापली होती. आता तो फक्त स्वतःच्या प्रसिद्धीकरता या प्रकरणाचा गाजावाजा करत आहे, असं ग्रामीण नाभिक संघटनेच्या अध्यक्षांचे म्हटलं आहे.काय आहे प्रकरण?
किरण ठाकूरने न्हाव्याने आपली मिशी कापली म्हणून त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. किरण ठाकूर 16 जुलै रोजी कन्हान येथील 'फ्रेंड्स जेन्ट्स पार्लर'मध्ये हेअरकट आणि दाढी करण्यासाठी गेला होता. तेव्हा दाढी करताना चुकून न्हाव्याकडून किरण ठाकूर याची मिशी कापली गेली.
यावरुन आधी किरण ठाकूर आणि न्हाव्यामध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर किरण ठाकूर आणि पार्लरच्या मालकातही वादावादी झाली. त्यानंतर किरणने न्हावी आणि जेन्ट्स पार्लरचा मालक अशा दोघांविरोधात तक्रार दाखल केली.