(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावरील अपघात थांबवण्यासाठी नागपूर विद्यापीठाची अनोखी कल्पना, काय आहे इनोव्हेटिव्ह मॉडेल?
Nagpur News : समृद्धी महामार्गावर हायवे हिप्नोसिस आणि टायर फुटल्याने होणाऱ्या अपघातांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाने अपघात थांबवण्यासाठी एक इनोव्हेटिव्ह मॉडेल तयार केले आहे.
Nagpur News : समृद्धी महामार्गावर हायवे हिप्नोसिस (महामार्ग संमोहन) आणि टायर फुटल्याने होणाऱ्या अपघातांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) भौतिकशास्त्र विभागाने अपघात थांबवण्यासाठी एक इनोव्हेटिव्ह मॉडेल (Innovative Model) तयार केले आहे. समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) दीडशे किलोमीटर प्रवास केल्यानंतर दर दोन किलोमीटरनंतर वाहनांची गती 20 किलोमीटर प्रति तास कमी करत आणायची आणि एका विशिष्ट अंतरानंतर समृद्धी महामार्गावर अर्धा किलोमीटरचा पाण्याचा भाग तयार करायचा. टप्प्याटप्प्याने दर दोन किलोमीटरनंतर वाहनांची गती कमी केल्यामुळे हायवे हिप्नोसिसचा (महामार्ग संमोहन) परिणाम होणार नाही. तर अर्धा किलोमीटरचा पाण्याच्या भागातून वाहन गेल्याने सिमेंट रस्त्यावर तीव्र गतीने चालल्यामुळे तापणाऱ्या टायर्सची योग्य कुलिंग होईल आणि टायर फुटणार नाहीत आणि अपघात टळतील असा भौतिकशास्त्र विभागाचा दावा आहे. विद्यापीठाचे डॉ. संजय ढोबळे आणि प्रियल चौधरी या दोन्ही संशोधकांनी हे इनोव्हेटिव्ह मॉडेल तयार केले असून लवकरच ते एमएसआरडीसीला सादर केले जाणार आहे.
काय आहे इनोव्हेटिव्ह मॉडेल?
# समृद्धी महामार्गावर 150 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर वाहनांची गती दर दोन किलोमीटरनंतर कमी करायची.
# 150 किलोमीटरनंतर दर दोन किलोमीटर अंतरावर वाहनांची गती 20-20 किलोमीटर कमी करत आणायची.
# वाहनांची गती दर दोन किलोमीटरनंतर 20 किलोमीटर प्रति तास कमी केल्यामुळे हायवे हिप्नोसिस होणार नाही.
# वाहनांची गती 40 किलोमीटर प्रति तास झाल्यानंतर महामार्गावर अर्धा किलोमीटर अंतराचा पाण्याचा टप्पा राहिल.
# पाण्याच्या टप्प्यातून प्रवास करताना टायर्सची योग्य कुलिंग होईल आणि ते फुटणार नाही.
# कुठे वाहनांची गती किती कमी करायची? कुठे पाण्याचा टप्पा आहे? हे वाहन चालकांना कळण्यासाठी योग्य साईन बोर्ड लावले जातील.
हायवे हिप्नोसिस म्हणजे काय?
हायवे हिप्नोसिस म्हणजेच महामार्ग संमोहन. हायवे हिप्नोसिस ही एक शारीरिक स्थिती आहे, यावेळी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते की, आपल्यासोबत काय घडतंय. हायवे हिप्नोसिस रस्त्यावर उतरल्यानंतर सुमारे अडीच तासांनी सुरु होते, संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात. संमोहनाच्या स्थिती असल्यामुळे डोळ्यांनी जे पाहतो त्याचं मेंदू विश्लेषण करु शकत नाही. हायवे हिप्नोसिस हे अनेक वेळा अपघात होण्यामागचं पहिलं कारण मानलं जातं. हायवे हिप्नोसिस हे लांब प्रवासादरम्यान मोकळ्या रस्त्यांवर घडते. वळण नसलेला रस्ता आणि वाहनांची वर्दळ नसलेल्या रस्त्यावर ही शक्यता जास्त असते. लांब रस्त्यावर रोड संमोहनपूर्वी काही काळ चलचित्र बघितल्यासारखं वाटतं आणि चालक फक्त समोर पाहत राहतो. त्याला आपल्या समोर काय घडतंय, हे चालकाला कळत नाही. वाहन चालवताना काही ठिकाणे आणि इतर वाहनांवर लक्षात ठेवणे आवश्यक आहे. शिवाय हायवे हिप्नोसिसपासून स्वतःला वाचवण्यासाठी, वाहन चालवताना दर दोन ते तीन तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे. यामुळे तुमचं मन फ्रेश राहिल.
हेही वाचा
Washim News :समृद्धी महामार्गावर डिझेल चोरणारी टोळी सक्रिय, पोलिसांच्या कारवाईत दोघे गजाआड