Nagpur Crime : पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये तृतीयपंथीयांच्या वेशातील दरोडेखोरांचा हैदोस; चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांची लूटमार
Nagpur Crime : पुणे-हतिया या एक्स्प्रेसमध्ये तृतीयपंथीयांच्या वेशात आलेल्या सहा दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण करीत त्यांना लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
नागपूर : पुणे-हतिया या एक्स्प्रेसमध्ये तृतीयपंथीयांच्या (Transgender) वेशात आलेल्या सहा दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण करीत त्यांना लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता पुण्यावरून निघालेली ही ट्रेन मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास वर्धा रेल्वेस्थानकावर आली असता ही घटना घडली. ज्यामध्ये ट्रेनच्या सर्वात शेवटी असलेल्या जनरल बोगीत सहा तृतीयपंथी शिरले. त्यानंतर त्यांनी प्रवाशांची जबरदस्तीने लूट (Nagpur Crime News) सुरू केली. परिणामी, ज्यांनी पैसे देण्यास नकार दिला त्यांना जबर माहारण केली. बराच वेळ चाललेल्या या थरारानंतर गाडी नागपूरजवळ (Nagpur) आली असता, त्यावेळी गाडीचा वेग कमी झाला आणि ही संधी साधून हे सहाही जण पळून गेले. पीडित प्रवाशांनी या घटनेसंदर्भात माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली असून फिर्यादी प्रवाशांचा तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जबरदस्ती पैशांची वसूली, प्रवाशांनाही मारहाण
22844 पुणे-हतिया ही गाडी बुधवारी सकाळी 11 वाजता आपल्या नेहमीप्रमाणे पुण्यावरून निघाली. ही ट्रेन मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास वर्धा रेल्वेस्थानकावर आली. दरम्यान, तेथे सर्वात शेवटी असलेल्या जनरल बोगीत सहा तृतीयपंथी शिरले. यातील चार साडी नेसून होते तर दोघांनी जीन्स पँट घातली होती. गाडीत शिरताच त्यांनी प्रवाशांना जबरदस्ती पैसे मागण्यास सुरुवात केली. प्रत्येकाकडे ते 500 रुपये मागत होते. पैसे देण्यास जे नकार देत होते, त्यांना जबर मारहाण करीत होते. एका महिलेजवळ पाचशे रुपये नव्हते त्यामुळे तिने पैसे देण्यास नकार दिला असता त्यावेळी लुटारूंनी तिच्या जवळील बाळाला हिसकावून घेतले. पैसे न दिल्यास बाळ घेऊन जाण्याची धमकी देखील दिली. त्यावेळी सहप्रवाशांनी तिच्यासाठी पैसे गोळा करून लुटारूंना दिले.
संधीचा फायदा घेत काढला पळ
बराच वेळ चाललेल्या या थरारानंतर गाडी नागपुरजवळ आली असता, त्यावेळी गाडीचा वेग कमी झाला आणि ही संधी साधून हे सहाही जण पळून गेले. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास गाडी नागपूर स्थानकावर आली तेव्हा तेथे उपस्थित आरपीएफ जवानांना काही प्रवाशांनी गाडीत घडलेला प्रकार सांगितला. याबाबत राजेशकुमार नावाच्या प्रवाशाचा बयाण लोहमार्ग पोलिसांनी नोंदवून घेतला. तो याच बोगीतून प्रवास करीत होता. या खळबळजनक घटनेमुळे रेल्वे पोलीस देखील थक्क झाले असून या दरोडेखोरांचा तपास पोलीस करत आहेत.
दरोडेखोरांचा शोध सुरू
मध्यरात्री चालत्या रेल्वेत असा धक्कादायक प्रसंग घडणे हे फार गंभीर आहे. या घटनेमुळे रात्रीच्या प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रत्यक्षदर्शीच्या बयाणावरून दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. ज्यामध्ये लोहमार्ग पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांनी त्वरित तृतीयपंथीयांची धरपकड करण्यासाठी पथक तयार केले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना देखील लवकरच पकडण्यात येईल. अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :