Nagpur ZP : जिल्हा परीषदेत 1.23 कोटींचा डिपॉझिट घोटाळा, 10 कंत्राटदारांवर गुन्हा दाखल
बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच फाईल्समधून डीडी आणि धनादेश काढून घेतले. काही लोकांनी काम मिळविण्यासाठी बनावट एफडीआर सादर केले असल्याची माहिती जिल्हा परीषदेचे मुख्याधिकारी योगेश कुंभेजकर यांना मिळाली होती.
नागपूरः जिल्हा परीषदेच्या लघु पाटबंधारे विभागात 1.23 कोटी रुपयांचा डिपॉझिट (सुरक्षा ठेव) घोटाळा पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विविध योजनांतर्गत केलेल्या कामांमध्ये कंत्राटदारांनी काम पूर्ण होण्यापूर्वीच सुरक्षा ठेव आणि एफडीआरचे पैसे काढून घेतले. अनेकांनी बनावट एफडीआर जमा केल्याचे तपासात समोर आले आणि पोलिसात तक्रार करण्यात आली. या प्रकरणी सदर पोलिसांनी जिल्हा परीषदेचे जलसंधारण अधिकारी बंडून विठ्ठल सयाम यांच्या तक्रारीवरून 10 कंत्राटदारांवर गुन्हा नोंदविला आहे.
हे आहेत आरोपी
संजय लक्ष्मण भक्ते रा. काटोल, संजय मारोतराव बडोदेकर रा. नरखेड, महेंद्र पांडुरंग चिचघरे रा. सूर्यनगर, नागपूर, विकेश धर्मदास हजारे रा. रमना मारोतीनगर, नीलेश सुरेश हिंगे रा. रमना मारोतीनगर, संजय शीतलाप्रसाद पांडे रा. मानेवाडा, ओमप्रकाश महादेव बरडे रा. लोहारी, नरखेड, महेश हरिदास गादेवार रा. जुनी मंगळवारी, रमेश पुरी रा. हिवरीनगर आणि संदीप अरुण अवचट रा. इतवारी अशी आरोपींची नावे आहेत.
गुणवत्ता तपासल्यानंतर मिळते रक्कम परत
जिल्हा परीषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे बांध बनविणे, कालवा दुरुस्ती, आदी कामे विविध योजनांतर्गत राबविण्यात येतात. या कामांचे कंत्राट योग्य कंत्राटदाराला ई-निविदेच्या माध्यमातून दिले जाते. त्यासाठी कंत्राटदारांकडून सुरक्षा ठेव आणि एफडीआर जमा करून घेतले जातात. कामाची गुणवत्ता तपासल्यानंतर निश्चित कालावधीत ही रक्कम कंत्राटदारांना परत केली जाते.
फाईलमधून डीडी आणि धनादेश गायब
आरोपी कंत्राटदारांनी वर्ष 2019-20 आणि 2020- 21 दरम्यान जारी करण्यात आलेल्या निविदेत बांधकाम आणि निश्चित कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच फाईल्समधून डीडी आणि धनादेश काढून घेतले. काही लोकांनी काम मिळविण्यासाठी बनावट एफडीआर सादर केले. जिल्हा परीषदेचे मुख्याधिकारी योगेश कुंभेजकर यांना याबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीत आरोपी कंत्राटदारांनी शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. कुंभेजकर यांच्या आदेशाने जिल्हा जलसंधारण अधिकारी बंडू सयाम यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.