(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture : शेतीमध्ये बंपर उत्पन्न घ्या, 50 हजार रुपये जिंका; शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा
शेतकऱ्यांला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी 300 रुपये राहील.
नागपूर : शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षिसे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्हृयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात, मका, तूर आणि सोयाबीन पिकासाठी अर्ज करुन पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी यांनी केले आहे. पिक स्पर्धेतील पिकांची निवड करतांना पिकनिहाय तालुक्यातील क्षेत्र किमान 1 हजार हेक्टर असावे. भात, मका, तुर, सोयाबीन पिकासाठी 31 ऑगस्ट मुदत राहणार आहे. पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागामध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. त्याबरोबरच त्यांचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना मिळून उत्पादनात मोलाची भर पडेल या उद्देशाने राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा, कापणी प्रयोग घ्यावयाची संख्या
पिकस्पर्धेसाठी पूर्ण तालुका हा एक घटक आभारभूत धरण्यात येईल, किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 असेल. पिकस्पर्धेत सहभागी लाभार्थ्यांच्या शेतावर त्यापिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे, पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या- सर्वसाधारण गटासाठी 5 व आदिवासी गटासाठी 4 असेल. पिकस्पर्धेतील पिकाच्या कापणीसाठी प्लॉटची निवड सांख्यिकी विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनूसार करण्यात येईल. पीक कापणी करताना असंबंधित मंडळातील अधिकारी यांना पर्यवेक्षण देण्यात येइल.
स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी लागणारे निकष
पिक स्पर्धेसाठी सर्व शेतकऱ्यांना भाग घेता येईल. शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असून जमीन तो स्वत: कसत असला पाहिजे. शेतकऱ्यांला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी 300 रुपये राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान 5 यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास, पीक स्पर्धा रद्द करण्यात येवून प्रवेश शुल्क परत प्रवेश शुल्क परत देण्यात येईल. स्पर्धा जाहिर झाल्यानंतर सहभागी शेतकऱ्यास प्रवेश शुल्क परत दिले जाणार नाही.
ज्या शेतकऱ्यांची पिकनिहाय उत्पादकता तालुक्याच्या सर्वसाधारण उत्पादकतेपेक्षा पट किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना पीकस्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येऊन त्यांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येतील.
पीक स्पर्धा विजेते व बक्षिसांचे स्वरुप
तालुकास्तरीय सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस याप्रमाणे प्रथम 5 हजार रुपये, द्वितीय 3 हजार रुपये, तृतीय 2 हजार रुपये. जिल्हास्तर प्रथम 10 हजार रुपये, द्वितीय 7 हजार रुपये व तृतीय 5 हजार रुपये. विभागस्तर प्रथम-25 हजार रुपये, द्वितीय- 20 हजार रुपये व तृतीय-15 हजार रुपये आणि राज्यस्तर प्रथम-50 हजार रुपये, द्वितीय- 40 हजार रुपये व तृतीय-30 हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरुप रहणार आहेत. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यात(प्रपत्र-अ) मध्ये भरुन ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन व सातबाराच्या उताऱ्यासह कागदपत्रांची पूर्तता करुन तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे पाठवावेत. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा.