(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wheat Price : मोठ्या व्यापाऱ्यांची साठेबाजी, विदर्भात गव्हाच्या दरात तीन ते सहा रुपयांची वाढ
गव्हाच्या या दरवाढीमागे सर्वच व्यापाऱ्यांनी केलेली सरसकट साठेबाजी कारणीभूत नाही, मात्र काही मोठ्या व्यापारांनी साठेबाजी केल्याची चर्चा आहे.
नागपूर : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये बाजारात गव्हाचे दर दोन ते तीन रुपये प्रति किलोने, तर चिल्लर बाजारात पाच ते सहा रुपये प्रति किलोने वाढले आहेत. यामागे केंद्र सरकारने नुकतंच गव्हाचे समर्थन मूल्य (Wheat Price MSP) वाढवण्याचा निर्णय घेणे, रशिया आणि युक्रेन मधील सुरू असलेले युद्ध थांबण्याची कुठलीच चिन्ह नसणे, तसेच काही व्यापाऱ्यांनी केलेली साठेबाजी कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
सध्या खरीप हंगाम संपला असून रब्बी हंगामात गव्हाची पेरणी होणार आहे. त्यामुळे गव्हाचे नवे पीक बाजारात येण्यास अनेक महिन्यांचा कालावधी लागणार असून तोवर गव्हाचे दर वाढलेलेच राहतील असं बाजारातील जाणकारांना वाटत आहे. मात्र केंद्र सरकारने गव्हाच्या मोठ्या व्यापारांसह बोलणी केल्यास गव्हाच्या दरांमधील ही वाढ नियंत्रणात आणता येऊ शकते असेही बाजारातील जाणकारांना वाटते आहे.
मोठ्या व्यापाऱ्यांनी साठेबाजी केल्याची चर्चा
केंद्र सरकारने गव्हाच्या समर्थन मूल्यात वाढ केल्यामुळे भविष्यात खाजगी व्यापाऱ्यांना चढ्या दराने शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करावा लागणार ही शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून मोठ्या व्यापाऱ्यांनी गव्हाच्या दरात वाढ केल्याची माहिती किराणा व्यापारी संघाचे सचिव ज्ञानेश्वर रक्षक यांनी दिली आहे. रशिया आणि युक्रेनमधील लांबत चाललेल्या युद्धामुळेही गव्हाच्या जागतिक बाजारपेठेवर विपरीत परिणाम होऊन त्याचा परिणाम भारतातील गव्हाच्या दरावर निश्चितच होतोय असंही रक्षक यांचं म्हणणं आहे.
गव्हाच्या या दरवाढी मागे सर्वच व्यापाऱ्यांनी केलेली सरसकट साठेबाजी कारणीभूत नाही, मात्र गव्हाच्या काही मोठ्या व्यापारांच्या गोदामामध्ये प्रचंड प्रमाणावर साठवलेला असून नवे पीक बाजारात येईपर्यंत हे मोठे व्यापारी चढलेल्या दरांचा फायदा उचलतील असे मत रक्षक यांनी व्यक्त केले. त्यासाठी सरकारला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी हस्तक्षेप करावाच लागेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गव्हाच्या एमएसपीमध्ये वाढ
केंद्र सरकारने येत्या रबी पिकांचे किमान हमी भाव म्हणजे एमएसपी जाहीर केले आहेत. गव्हाची एमएसपी 2015 रुपयांवरुन 2125 क्विंटल म्हणजे 110 रुपयांनी वाढवली आहे. तर हरभऱ्याचा एमएसपी 1635 वरुन 1735 म्हणजे 105 रुपयांनी वाढवण्यास केंद्रिय कॅबिनेटने मान्यता दिली आहे.
गहू, हरभऱ्याप्रमाणेच इतर महत्वाच्या सहा रबी पिकांचा एमएसपी वाढवला आहे. मसूरचा एमएसपी सर्वाधिक 500 रुपये वाढून 6 हजार रुपये क्विंटल झाली आहे. तर मोहरीचा एमएसपी 400 रुपयांनी वाढवला आहे. करडईचा एमएसपी 5 हजार 441 होता. तो 209 रुपयांनी वाढून 5 हजार 650 रुपये क्विंटल झाली आहे.