काय सांगता! नागपुरात चोरट्यांनी मारला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी डल्ला, पिस्टल आणि 30 जिवंत काडतूस चोरीला
नागपुरात (Nagpur Police) राज्य राखीव पोलीस दलाच्या कमांडंटच्या गनमॅनचे बंदुकीच्या 30 गोळ्यासह पिस्टल चोरीला गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिस्टल आणि काडतुस चोरट्यांनी पोलीस वसाहतीतील घरात घुसून पळविले आहे
नागपूर: नागपुरात (Nagpur News) चोरट्यांनी थेट पोलिसांची बंदूक आणि गोळ्याच चोरल्या आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातून पिस्टल आणि 30 जिवंत काढतूस चोरीला गेल्याची घटना नागपुरात घडली आहे. नागपुरात (Nagpur Police) राज्य राखीव पोलीस दलाच्या कमांडंटच्या गनमॅनचे बंदुकीच्या 30 गोळ्यासह पिस्टल चोरीला गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिस्टल आणि काडतुस चोरट्यांनी पोलीस वसाहतीतील घरात घुसून पळविले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच चोरटे आव्हान देत असल्याचे चित्र आहे.
राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस जवान मंगेश लांजेवार जवानांच्या वसाहतीत राहतात. लांजेवार हे एस.आर.पी.एफ. गट क्र. 4 च्या समादेशक प्रियंका नारनवरे यांचे गनमॅन पदी कार्यरत आहे. मंगेश लांजेवार त्यांचे पिस्टल व 30 जिवंत काडतूस घरी ठेवून, साप्ताहिक सुटी असल्याने भंडारा येथे गेले होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून आलमारीचे कुलूप तोडले व आत असलेले पिस्टल व 30 जिवंत काडतूस चोरून नेले. मंगेश हे नागपूरला परत आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलले आणि पिस्तूल व काडतुसे गायब असल्याचे दिसले . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे यापूर्वी नागपूर शहरातील एका ठाणेदाराचेही सर्व्हिस रिव्हॉल्व्हर चोरीला गेले असून, त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.
पोलिसांचा धाकच नाही...
मागील काही दिवसांपासून नागपुरात गुन्हेगारीने कहर केला आहे. रोज नव्या घटना समोर येत आहे. मारहाण, दहशत, चोरी आणि हल्ल्यांच्या घटनांचं प्रमाण जास्त आहे. त्यातच पोलिसांना मारहाण केल्याच्यादेखील घटना समोर येत आहे. पोलिसांच्या घरात चोरी झााल्याने त्यामुळे पोलिसांचा धाक उरला नाही का?, किंवा वर्दीची भीती उरली नाही काय, असे प्रश्न पुन्हा उपस्थित होताना दिसत आहे.
तहसीलदारांच्या नावाने सोन्याच्या व्यापाऱ्याला लुटलं
तहसीलदार साहेबांना सोने घ्यायचं आहे असं सांगत बुलढाण्यातील एका सराफ व्यावसायिकाला गंडा घातल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या प्रकरणातील आरोपीला आता पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. चिखली तहसीलदारांच्या नावाने या आरोपीने सराफ व्यापाऱ्याला गंडा घालत 12 ते 15 ग्रॅमच्या अंगठ्या आणि चेन लंपास केले होते. आता त्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तहसीलदार साहेबांना सोने घ्यायचे आहे, त्यांनी विश्वसनीय तसेच खात्रीचे दुकान म्हणून तुमच्या दुकानात पाठवले आहे, असं या आरोपीने सराफ व्यापाऱ्याला सांगितलं. त्यानंतर सिनेस्टाईलने सगळ्या गोष्टी पार पाडत त्याने व्यापाऱ्याला फसवलं.