Nagpur Solar Explosives Blast: नागपूरमधील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, 17 कामगार जखमी
Nagpur Solar Explosives Blast: नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत काल मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोट झाला.

Nagpur Solar Explosives Blast: नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत (Nagpur Solar Industries Blast) काल (3 सप्टेंबर) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोट झाला. या स्फोटात 1 कामगाराचा मृत्यू झाला असून 17 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींना नागपूरच्या विविध खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 4 जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
काल रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास सोलार एक्स्प्लोसिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. सीबी वन या प्लांटमध्ये स्फोट होण्यापूर्वी काही प्रमाणात धूर निघत असल्यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांना काहीतरी अगतिक घडेल असा अंदाज आला आणि सर्व कामगारांनी बाहेरच्या दिशेने धाव घेतली. मात्र संबंधित प्लांटमधील मयूर गणवीर हे वेळेत बाहेर पडू शकले नाही. तेवढ्यात स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की, प्लांटच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर लांबपर्यंत उडाले आणि त्या मलब्याच्या आघाताने अनेक कामगार जखमी झाले.
सर्व जखमी नागपूरातील विविध रुग्णालयात दाखल-
पोलीस, अग्निशमन दलासह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी रात्री उशिराच घटनास्थळी दाखल झाले होते. सुरुवातीला घटनास्थळी काही वेळ पुन्हा स्फोट घडणार नाही, याची काळजी म्हणून वाट पाहण्यात आली, त्यानंतर कूलिंग ऑपरेशन करून मालब्याखाली दबलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना प्रथमोपचारानंतर नागपूरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळपासून सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या समोर बघ्यांची गर्दी वाढली असून सकाळ पाळीतील कर्मचाऱ्यांना ही आत घेण्यात आलेले नाही.























