Nagpur Rains : पहिल्याच पावसात नागपूरमधील नरेंद्र नगर अंडरपास बंद; पोलीस, मनपा प्रशासन न पोहोचल्याने रिक्षाचालक सांभाळतोय वाहतूक
Nagpur Rains : नागपुरातील नरेंद्र नगर अंडरपासमध्ये आज (23 जून) सकाळपासूनच एका बाजूची वाहतूक बंद पडली आहे. कारण अंडरपासच्या एका बाजूच्या बोगद्यामध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे.
Nagpur Rains : धो धो पाऊस पडला की अनेक शहरात पावसाचं पाणी साचून वाहतूक बंद पडल्याच्या घटना घडतात. मात्र नागपुरात (Nagpur) पहिल्याच पावसात ती परिस्थिती उद्भवली आहे. नागपुरातील नरेंद्र नगर अंडरपासमध्ये आज (23 जून) सकाळपासूनच एका बाजूची वाहतूक बंद पडली आहे. कारण अंडरपासच्या (Underpass) एका बाजूच्या बोगद्यामध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. महत्त्वाचं म्हणजे नागपूर पोलीस आणि नागपूर महानगरपालिका कोणीही या ठिकाणी पोहोचलेलं नाही. एकटा रिक्षाचालक वाहतूक वळवत असून वाहतूक सांभाळत आहे.
नालेसफाई न झाल्याने पाणी रस्त्यावर अंडरपासमध्ये वाहतूक कोंडी
खरं पाहिलं तर नागपुरात एवढा मोठा पाऊस पडलेला नाही. मात्र अवतीभवती निर्माण कार्य सुरु असून त्यासाठीचं बांधकाम साहित्य रस्त्याच्या कडेला पडून आहे. शेजारच्या नाल्याची म्हणावी तशी सफाई झालेली नाही. तिथेही कचरा साचून आहे आणि त्यामुळे नाल्याचा पाणी रस्त्यावर येऊन अंडरपासमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे.
रिक्षाचालक सकाळी सहा वाजल्यापासून वाहतूक सांभाळतोय
दरम्यान या ठिकाणी साफसफाईकडे दुर्लक्ष करणारे महापालिका प्रशासन आज पाणी भरल्यानंतरही गेले तीन तास पोहोचलेलं नाही. पोलीस प्रशासन ही त्या ठिकाणी नाही. त्यामुळे एक ऑटोचालक सकाळी सहा वाजल्यापासून त्या ठिकाणी एकटा उभे राहून वाहतूक सांभाळत आहे.
नागपुरात सकाळपासून पावसाला हजेरी, 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज
दरम्यान आज सकाळपासून नागपुरात पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळी वातावरण असून नागपूर शहरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. त्यामुळे गेले काही दिवस प्रचंड उकाड्याने हैराण असलेल्या नागपूरकरांना आजची सकाळ दिलासा देणारी ठरली आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार हे पाऊस मान्सून पूर्व पाऊस असून मान्सून अजूनही विदर्भात सक्रिय झालेला नाही. 25 जूननंतर पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी
राज्यातील नागपूर, मुंबईतील वांद्रे, दादर आणि ठाणे परिसरात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं सध्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सक्त गरज आहे.
हेही वाचा