निधी वाटप करताना महाविकास आघाडीमधील काही मंत्री मोबदल्याची अपेक्षा ठेवतात : आशिष जयस्वाल
निधी वाटप करताना महाविकास आघाडीमधील काही मंत्री मोबदल्याची अपेक्षा ठेवतात. हे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. 20 जूनपर्यंत सोक्षमोक्ष लागला नाही तर मंत्र्यांची पोलखोल करणार, असं आमदार आशिष जयस्वाल म्हणाले.
नागपूर : निधी वाटप करताना महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री मोबदल्याची आणि हिस्सेदारीची अपेक्षा ठेवतात का? या प्रश्नावर शिवसेना समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात मला असेच अनुभव आले आहेत आणि अनेक आमदारांना असेच अनुभव आलेले आहेत. हे अनुभव मी मुख्यमंत्र्यांना सांगणार असून जर त्यानंतरही बदल झाले नाही तर आम्ही वेगळा विचार करु, असे आमदार आशिष जयस्वाल म्हणाले. मोबदल्याची किंवा हिस्सेदारीची अपेक्षा ठेवणारे मंत्री कोण या प्रश्नावर मात्र आशिष जयस्वाल यांनी थेट उत्तर दिले नाही. या क्षणाला यापेक्षा जास्त मीडियासमोर बोलणं योग्य वाटत नाही. राज्यसभा आणि विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि तोपर्यंत या मुद्द्याचा सोक्षमोक्ष झाला नाही तर त्यानंतर या मुद्द्यावर बोलू. तुम्ही वाट बघा, योग्य वेळ आल्यानंतर या मुद्द्याचा समाचार निश्चितच घेईन, असे जयस्वाल म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक आमदारांचे असेच अनुभव आहेत. मात्र, हे सर्व बोलण्यामध्ये त्यांना अडचण आहे. त्यामुळे मी फक्त माझी व्यथा सांगत नाही तर अनेक आमदारांच्या मनातल्या वेदना माझ्या शब्दातून व्यक्त करत असल्याचे जयस्वाल म्हणाले. काही मंत्री ज्या पद्धतीने अपक्ष आमदारांच्या मतदारसंघातील कामाबद्दल उदासिनता दाखवतात, जाणूनबुजून नकारात्मक कृती करतात, अपक्ष आमदारांची कुचंबणा करतात त्यांनी विसरु नये की ते आमच्यामुळेच मंत्री आहेत, याची आठवणही आशिष जयस्वाल यांनी करुन दिली.
काही मंत्री चांगल्या पद्धतीने आमची काम करतात मात्र काही मंत्री आमदारांच्या मतदारसंघात निधी देत नाही. निधी देताना तो आमदाराला न विचारता तिथल्या इतर पक्षीय लोकांच्या हाती देतात. हे कोणत्याही आमदाराला सहन होणार नाही आणि मी स्वतः कधीही सहन करणार नाही. जे मंत्री चांगलं काम करतात आमदारांच्या अडचणी समजून घेत त्यांचा सन्मान करत त्यांच्याविरोधात मी बोलणार नाही. अजित पवार, राजेश टोपे, एकनाथ शिंदे असेच मंत्री आहेत. मात्र काही मंत्री तसे वागत नाही त्यामंत्र्यांबद्दल सध्या बोलणे योग्य वाटत नाही. कारण निवडणुकीपूर्व तसे बोलणे योग्य होणार नाही. मात्र, 20 तारखेनंतर त्या मंत्र्यांची पोल-खोल नक्कीच करणार असा इशारा जयस्वाल यांनी दिला आहे.
राज्यसभा निवडणुकीमध्ये मी शिवसेनेसोबतच राहणार आहे. मी उद्धवजींचा कार्यकर्ता आहे. माझ्या शरीरामध्ये शिवसेनेचे रक्त आहे. मात्र आमदारांच्या मनामध्ये जी नाराजी ती दूर झाली पाहिजे. ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले पाहिजे आणि आमदारांना संरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मी हे प्रयत्न करत आहेत असल्याचे ते म्हणाले. अपक्ष आमदारांच्या मनामध्ये जी काही नाराजी आहे, अडचणी आहेत त्या संदर्भात पुढील दोन-तीन दिवसात त्यांच्या अडचणी दूर केल्या जातील. मुख्यमंत्री यांची नाराजी दूर करतील असा विश्वासही जयस्वाल यांनी व्यक्त केला.