Nagpur : तापमानाचा उच्चांक गाठणाऱ्या विदर्भातून चक्क आईस हॉकीचं प्रमाणपत्र, बोगस क्रीडा प्रमाणपत्रांवर नोकरी करणाऱ्यांचा पर्दाफाश, शेकडो सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश
Bogus sports certificates : क्रीडा खात्याने नुकत्याच केलेल्या गौप्यस्फोटात जवळपास 109 सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी बोगस क्रीडा प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचं समोर आलं
Nagpur News Update : राज्यातील बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात शुक्रवारी (29 जुलै) क्रीडा खात्याकडून मोठा गौप्यस्फोट करण्यात आला. चौकशीत जवळपास 109 सरकारी नोकरीतील अधिकारी आणि कर्मचारी सापडले आहेत, ज्यांनी बोगस क्रीडा प्रमाणपत्र देऊन नोकऱ्या मिळवल्या आहेत. यातील 17 जणांना आधीच नोकरीतून बडतर्फ देखील करण्यात आले आहे.
चूकीच्या पद्धतीने सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्यांना नुकताच क्रीडा विभागाने मोठा दणका देत सर्वांची नावे थेट संकेतस्थळावर जाहीर केली. यात प्रामुख्याने सॉफ्टबॉल, तलवारबाजी, पॉवरलिफ्टिंग, ट्रॅम्पोलिन, कयाकिंग या खेळांमधील प्रमाणपत्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अगदी कडक ऊन असणाऱ्या विदर्भातून आईस हॉकीसारख्या खेळाचे प्रमाणपत्र देऊन काहींनी नोकरी मिळवली आहे. या घोटाळ्याची चौकशी घोषित करणारे माजी क्रीडा मंत्री सुनील केदार यानी सांगितले की, ''हा घोटाळा लक्षात आल्यावर भविष्यात असे होऊ नये यासाठी काही पाऊले उचलली होती जी पूर्णत्वाकडे पोहचत आहेत.''
मागील 10 ते 15 वर्षात नोकरी घेतलेल्यांच्या बऱ्याच तक्रारी आल्या होत्या. यामध्ये जवळपास 900 लोकांच्या तक्रारी आल्या होत्या. यामध्ये खोट्या सह्या, वेरीफिकेशन करायला सिस्टिमच्या आतून चूकीच्या पद्धतीने मदत करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचाही समावेश होता. यामध्ये कृषी, पोलीस, आरोग्य, शिक्षण, रेव्हेन्यू, लेखापरीक्षक अशा सर्वच विभागात खोटे क्रीडा प्रमाणपत्र देऊन नोकऱ्या बळकावलेले लोक आहेत. या प्रकरणात नागपूर विभागाचे तत्कालीन क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांच्यासह राज्यातील काही जणांना अटक करण्यात आली होती. चौकशीच्या दरम्यान या सर्वांना त्यांनी दिलेल्या क्रीडा प्रमाणपत्रातील खेळाबाबत अगदी बेसिक माहिती देखील नसल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे वेट लिफ्टिंगचं प्रमाणपत्र देणारे साधं वजनही उचलू शकत नव्हते. विशेष म्हणजे अशाच प्रकारची कारवाई नागपूर पोलिसांनी याआधी परभणी येथे केली होती.
हे देखील वाचा -