Nagpur News : भाजपतर्फे कामगारांसाठी आयोजित शिबीरात गोंधळ; चेंगराचेंगरी एका महिलेचा मृत्यू
Nagpur News: नागपूर भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात महिलांची प्रचंड गर्दी उसळल्याने कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरी झाली असून यात एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
Nagpur News : नागपूर (Nagpur) भाजपतर्फे (BJP) बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात एकच गोंधळ झाल्याचे समोर आले. या शिबीराला महिलांची प्रचंड गर्दी उसळल्याने कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरी झाली असून यात एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती (Nagpur News) पुढे आली आहे. तर अनेक महिला यात जखमी झाल्या आहेत. मनूबाई तुळशीराम राजपूत (रा. आशीर्वाद नगर) असे या मृतक महिलेचे नाव आहे. ही घटना आज शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात येथे घडली.
भाजपतर्फे कामगारांसाठी आयोजित शिबीरात गोंधळ
नागपूर शहारात 8 मार्च ते 11 मार्च दरम्यान भाजपतर्फे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत, नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात महिलांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण होणार होते. शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सकाळी 10 ते 4 या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले.
दरम्यान, आज सकाळपासूनच सुरेश भट सभागृहासमोर लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. सकाळी सव्वा दहा वाजेनंतर सभागृहाचे दार उघडले असता आत जाण्यासाठी सर्वांनी एकच धाव घेतली. दरम्यान कामगारांसाठी आयोजित शिबीराचे नियोजन बिघडल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेक महिला खाली पडल्याने त्यांना दुखापत झाली.
चेंगराचेंगरी एका महिलेचा मृत्यू
या चेंगराचेंगरीत मनुबाई खाली पडल्याने त्यांच्या अंगावर देखील काही लोक पडल्याने त्या जबर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मनुबाईंवर उपचार करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. यातील काही जखमी महिलांवर सध्या उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त वगळता सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि नेतेमंडळी घटनास्थळावरून निघून गेले. या घटनेनंतर हे शिबिर रद्द केल्याची घोषणा करण्यात आली. तर चेंगराचेंगरीच्या ठिकाणची शेकडोच्या संख्येने सुटून गेलेल्या पादत्रानाची साफसफाई करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या