BJP Loksabha List: नितीन गडकरींना नागपूरमधून लोकसभेची उमेदवारी दिल्यास काय होईल, भाजपचा अंदाज काय? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Nagpur News: भाजपचा महाराष्ट्रातील पहिला उमेदवार ठरला, हमखास विजयाची खात्री, 65 टक्के मतं घेऊन होणार विजयी. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले.
नागपूर: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली होती. यामध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांचा आणि बड्या मंत्र्यांचा समावेश होता. परंतु, भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही नावे होती. त्यामुळे महाराष्ट्रातून भाजपने किमान नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उमेदवारीची घोषणा करायला पाहिजे होती, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांची घोषणा होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राज्यातील पहिल्या उमेदवाराचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. अर्थात हे नाव नितीन गडकरी यांचेच आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे स्पष्ट संकेत दिले. त्यांनी नितीन गडकरी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा केला. याचा अर्थ नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी मिळणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, महायुतीच्या लोकसभा जागावाटपाबाबत अंतिम निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. जागावाटपाची प्राथमिक चर्चा उत्तम आणि समाधानकारक झाली आहे. आता 11 ते 12 तारखेपर्यंत महायुतीचे जागावाटप जाहीर होईल. मित्रपक्षांनी (शिंदे गट, अजितदादा गट) आपली बाजू मांडली आहे, आम्ही आमची बाजू मांडली आहे. जो उमेदवार निवडून येऊ शकतो, त्याला उमेदवारी द्यायचे ठरले आहे. तिन्ही पक्षातील मोठे नेते एकत्र बसून अंतिम जागावाटप निश्चित करतील. शिवसेनेची जास्त जागांची मागणी आहे. मात्र, महायुतीला जिंकायचे असेल तर सर्वांना एक पाऊल मागे यावे लागेल. तर नागपूरमधून नितीन गडकरी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. त्यांना एकूण मतदानाच्या 65 टक्के मतं मिळतील. ज्यांना नितीन गडकरी यांच्याविरोधात लढायचे आहे, त्यांनी लढण्याची हौस पूर्ण करावी. नाना पटोले यांनीच नितीन गडकरी यांच्याविरोधात लढावे, ते एकदा लढलेच आहेत, अशी खोचक टिप्पणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
नागपूरमध्ये काँग्रेस तगडा उमेदवार रिंगणात उतरवेल, योग्यवेळी पत्ते उघड करु: नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर लोकसभेच्या रिंगणात तगडा उमेदवार उतरवण्याची भाषा केली आहे. काँग्रेसकडे नागपूरसाठी तगडा आणि जिंकणारा उमेदवार आहे. अजून आम्ही आमचे पत्ते उघड केलेले नाहीत, असे नाना पटोले यांनी म्हटले. जागा वाटपाबद्दल लवकरच निर्णय होईल. अजून महायुतीचे जागावाटप झालेले नाही. मात्र, महायुतीच्या आधी आमचे (मविआ) जागावाटप जाहीर होईल, असे नाना पटोले यांनी सांगितले.
आणखी वाचा
भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी, नितीन गडकरींना तिकीट मिळालं का? माढ्याचा उमेदवार कोण?