Nagpur News : सेट टॉप बॉक्स ओढणाऱ्या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू, नागपुरातील धक्कादायक घटना
Nagpur News : लहान मुलांकडे थोडं जरी दुर्लक्ष केलं तर काय घडू शकतं याचा प्रत्यय नागपुरातील घटनेवरुन येतो. टीव्हीचा सेट टॉप बॉक्स ओढणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे.
![Nagpur News : सेट टॉप बॉक्स ओढणाऱ्या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू, नागपुरातील धक्कादायक घटना Nagpur News Shocking incident in Nagpur death of toddler pulling set top box due to electric shock Nagpur News : सेट टॉप बॉक्स ओढणाऱ्या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू, नागपुरातील धक्कादायक घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/09/1f7ac2c61028b25e7aee1f5fabd3c39d169155314335383_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur News : लहान मुलांकडे थोडं जरी दुर्लक्ष केलं तर काय घडू शकतं याचा प्रत्यय नागपुरातील घटनेवरुन येतो. टीव्हीचा सेट टॉप बॉक्स (Set Top Box) ओढणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा विजेचा शॉक (Electric Shock) लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात (Nagpur) घडली आहे. नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील खैरी पन्नासे गावात ही दुर्दैवी घटना घडली. प्रियांशू ज्ञानेश्वर चव्हाण असे मृत बालकाचं नाव आहे.
खेळताना सेट टॉप बॉक्स घेतला आणि...
चिमुकला प्रियांशू घरात खेळत होता. खेळता खेळता त्याने घरातील टीव्हीचा सेट टॉप बॉक्स हातात घेतला आणि बॉक्स ओढत तो घेऊन गेला. त्याच वेळी त्याला जोरदार शॉक लागला, त्यात तो बेशुद्ध झाला. वडिलांनी त्याला उपचारासाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
भंडाऱ्यात स्लॅबवरुन उडी घेण्याच्या खेळात बालकाचा खाली पडून मृत्यू
घराच्या स्लॅबवरुन उडी घेण्याच्या खेळात खाली पडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची वेदनादायक घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यात नऊ दिवसांपूर्वी घडली होती. उमंग प्रशांत साखरवाडे असं नऊ वर्षीय मृत बालकाचं नाव आहे. ही घटना भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी या गावात घडली होती. उमंग प्रशांत साखरवाडे हा मुलगा आणि त्याचा धाकटा भाऊ सोमवारी (31 जुलै) शाळा आटोपून घरी आले. घरी कुणीही नसताना घराच्या स्लॅबवरुन लगतच्या दुसऱ्या घराच्या स्लॅबवर उडी मारण्याचा चित्तथरारक खेळ दोन्ही भावंडं खेळत होते. मात्र यावेळी मोठा भाऊ स्लॅबवरुन उडी मारताना तोल जाऊन थेट उंचावरुन जमिनीवर कोसळला. यात त्याच्या शरीरात अंतर्गत जखमा झाल्याने तो निपचित पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मोठा भाऊ स्लॅबवरुन खाली कोसळल्याने लहान भावाने धावत जाऊन ही बाब शेतात काम करत असलेल्या वडिलांना सांगितली. वैद्यकीय उपचारासाठी नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
सध्या सगळ्यांचंच आयुष्य धकाधकीचं आणि धावपळीचं झालं आहे. मुलांचं भविष्य चांगलं असावं, त्यांना सर्व सुखसोयी मिळाव्यात यासाठी आई-वडील दोघेही नोकरी करत आहेत. घर आणि नोकरी अशी तारेवरची करताना पालकाचं मुलांकडे थोडं फार दुर्लक्ष होतं आणि एखादी दुर्घटना घडते. त्यामुळे आपल्या पाल्यांकडे डोळ्यात तेल लावून लक्ष देण्याची गरज आहे.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)