Devendra Fadnavis : शेवटच्या महिन्यात निधी खर्च करण्याची पद्धत बंद करा, उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला खडसावले
येत्या काळात 43 हजार झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देणार आहोत. गेल्या दोन-अडीच वर्षांत योजना बंद पडली होती. आता ती आम्ही पूर्ववत सुरू करणार असल्याची ग्वाही यावेळी फडणवीसांनी दिली.
Nagpur : नागपूर जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आज पार पडली. जिल्ह्याचा आराखडा, मागील वर्षीचा अखर्चित निधी आणि यावर्षी आत्तापर्यंत किती निधी आला, याचा आढावा घेतला. निधी वेळेत खर्च झाला पाहिजे आणि शेवटच्या महिन्यांमध्ये निधी खर्च करण्याची पद्धत आता बंद झाली पाहिजे, असा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. नियोजन मंडळाची बैठक आटोपल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डीपीडीसीमध्ये (DPDC) आमदारांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्या मुद्द्यांना योग्य तो प्रतिसाद देण्याचा आमचा प्रयत्न असेल. जीएमसीला (government medical college nagpur) 75 वर्ष पूर्ण झाले, हॉस्टेलची अवस्था वाईट आहे. येत्या काळात ते काम आम्ही हातात घेऊ. यापूर्वी मी मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला (GMC) निधी दिलेला आहे. आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Mayo) रुग्णालयाला (IGMC) दोन्ही हॉस्पिटलमध्ये चांगली कामे झाली आहेत.
43 हजार झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे लवकरच
अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले आहेत, हे रस्ते करण्यासाठी जिल्हा परिषद व्यतिरिक्त दुसरे कुठले प्रावधान नाही. त्यामुळे आता आम्ही ग्रामीणच्या रस्त्यांसाठी स्वतंत्र हेड तयार करणार आहोत. झोपडपट्टीतील पट्टे वाटपाचाही प्रश्न या बैठकीत पुढे आहे. येत्या काळात 43 हजार झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देणार आहोत. आमच्या सरकारमध्ये ही योजना आम्ही सुरू केली होती. पण गेल्या दोन-अडीच वर्षांत योजना बंद पडली होती. आता ती आम्ही पूर्ववत सुरू करणार आहोत. पट्टे मिळाल्यामुळे घर बांधण्यासाठी त्या लोकांना कर्जदेखील घेता येईल आणि पंतप्रधान आवास योजनेतील पैसेही त्यांना उपलब्ध होऊ शकतील, असे फडणवीस यांनी सांगितले.
कचरा, सांडपाण्याची विल्हेवाट शास्त्रशुद्ध पद्धतीनेच
ग्रामीण भागात हद्दवाढीचे विषय आहेत, त्या विषयालादेखील हात घालत आहोत. ग्रामपंचायतींमध्ये विशेषतः पेरीअर्बन भागात कचरा मोठ्या प्रमाणात तयार होतो. पण त्या कचऱ्याचा निचरा होत नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान टप्पा २ सुरू केला आहे. यामध्ये प्रत्येक शहर आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी निधी मिळणार आहे. त्याचा एक समग्र आराखडा नागपूर जिल्ह्याचा तयार करून त्याच्यातील गॅप काढण्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कचरा आणि सांडपाण्याची विल्हेवाट शास्त्रशुद्ध पद्धतीने लागली पाहिजे, यासंदर्भातही आजच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या