Ashish Deshmukh on Congress : पटोलेंच्या विरोधातील असंतोष काँग्रेस श्रेष्ठींना जाणवू लागलाय, लवकर उचलबांगडी होईल; आशिष देशमुख यांचा घणाघात
Ashish Deshmukh On Congress : नाना पटोले यांच्याविरोधातील काँग्रेसमधील तीव्र असंतोष काँग्रेसश्रेष्ठींना जाणवायला लागला आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेस श्रेष्ठी त्या संदर्भात अंतिम निर्णय घेतील, अशा शब्दात आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
Ashish Deshmukh On Congress : नाना पटोले यांच्याविरोधातील काँग्रेसमधील तीव्र असंतोष काँग्रेसश्रेष्ठींना जाणवायला लागला आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेस श्रेष्ठी त्या संदर्भात अंतिम निर्णय घेतील, अशा शब्दात काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करताना आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला आहे. शिवाय नाना पटोले (Nana Patole) यांची लवकरच उचलबांगडी होईल असा दावाही त्यांनी केला आहे. एबीपी माझाशी बोलताना आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर घणाघात केला.
पटोलेंच्या विरोधातील असंतोष काँग्रेस श्रेष्ठींना जाणवू लागला आहे
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल नक्कीच होणार आहे. प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी सर्वात आधी मीच केली होती. तेव्हा माझ्यावर ताशेरे ओढले, माझ्या तक्रारी केल्या. मात्र, आता नाना पटोले यांच्याविरोधातला काँग्रेसमधील तीव्र असंतोष काँग्रेस श्रेष्ठींना जाणवायला लागला आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेस श्रेष्ठी त्या संदर्भात अंतिम निर्णय घेतील. मी आता काँग्रेसमध्ये नाही त्यामुळे जास्त बोलणं योग्य नाही, असं देशमुख म्हणाले.
'ओबीसींच्या कल्याणासाठी, विदर्भाच्या हितासाठी काम करणार'
नितीन गडकरी यांच्या भेटीबाबत आशिष देशमुख म्हणाले की, "मी भाजपमध्ये घर वापसी करत आहे. नितीन गडकरी यांनी मला अनेक वेळेला संधी दिली आहे, गडकरी साहेबांशी माझा ऋणानुबंध आहे. त्याच नात्याने आज त्यांची भेट घेतली, आशीर्वाद घेतले." तसंच पक्षाची इच्छा असेल की मी संघटनात्मक काम करावे तर मी कार्यकर्ता म्हणून काम करेन. ओबीसींच्या कल्याणासाठी आणि विदर्भाच्या हितासाठी आशिष देशमुख भाजपमध्ये काम करेल, असं ते म्हणाले.
...तर राहुल गांधी खासदारकीपासून वंचित राहिले नसते
दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना आशिष देशमुख म्हणाले की, "राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागण्याची मागणी मी केली होती. राहुल गांधींनी ते ऐकले असते, तर ते खासदारकीपासून वंचित राहिले नसते. त्यांच्यावर राजकारणातून बाद होण्याची परिस्थिती आली नसती. देशातील 54 टक्के ओबीसींविरोधात जर काँग्रेस आणि गांधी परिवार वागणार असेल तर ओबीसी भाजपच्या पाठिशी एकत्रित राहिल्याशिवाय राहणार नाही."
आशिष देशमुख 18 जून रोजी भाजपमध्ये घरवापसी करणार
दरम्यान आशिष देशमुख 18 जून रोजी भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. नागपूर जवळच्या कोराळी येथील नैवेद्यम सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आशिष देशमुख यांना भाजप कुठल्या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देणार, अशी चर्चा नागपुरात सुरु आहे. मात्र माझाला मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने देशमुख यांना पद किंवा मतदारसंघाचं आश्वासन दिलेलं नाही. त्यांना आधी संघटनात्मक जबाबदारी दिली जाईल, असं कळतंय.
हेही वाचा