Vijay Vadettiwar on Maharashtra Govt : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्ही टेरर नेते, त्यांचं किती काळ जमतं ते पाहू : विजय वडेट्टीवार
Vijay Vadettiwar on Shinde-Fadnavis Govt : फडणवीस आणि पवार दोन्ही टेरर नेते आहेत, त्यांचं किती काळ जमतं ते पाहू," असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
Vijay Vadettiwar on Shinde-Fadnavis Govt : "फडणवीस आणि पवार दोन्ही टेरर नेते आहेत, त्यांचं किती काळ जमतं ते पाहू," असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी म्हटलं आहे. तसंच पूर्वीच्या सरकारला रिक्षा बोलत होते मग आताच्या सरकारला रिक्षा म्हणायचं की घसरगाडी असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला आहे. नागपुरात (Nagpur) पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "पूर्वी तीन पक्षांचं सरकार होतं त्याला रिक्षा म्हणत होते. त्या रिक्षाने संकटावर मात अडीच वर्षे सरकार चालवले. आता यांच्या तीन चाकी रिक्षा म्हणायचं की घसरगाडी म्हणायचं? यांच्या तीन चाकातील पहिला टायर कधी पंचर होतो ते आता लोक बघणार आहे. सत्तेसाठी एवढा हावरटपणा महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही, जो आता महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळत आहे."
राज्यातील राजकारण्यांना लाज वाटावी अशी परिस्थिती
मतदानाला जायची इच्छा राहिली नाही, अशी लोकांची भावना आहे. यावरुन राज्यातील राजकारण्यांना लाज वाटावी, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. विकासाच्या नावावर सरकार आणायचं आणि विकासकामं ठप्प पाडायची. सत्तेच्या मलिदेसाठी भांडायचं असा लज्जास्पद प्रकार जनता बघत आहे. अशा राजकारण्यांची कशी जिरवायची अशी संधीची वाट लोक बघत आहेत
अर्थ विभाग अजित पवारांकडे गेलं तर ज्या कारणामुळे हे लोक सत्तेतून बाहेर पडले आणि तेच कारण घेऊन सत्तेच्या बाहेर पडतील का याची जनता वाट पाहत आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.
फडणवीस आणि पवार हे दोन्ही नेते टेरर
देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार दोन्ही नेते टेरर आहेत, त्यांचं किती काळ जमतं ते पाहू. त्यांना दोन-तीन मंत्रिपद मिळतील अशी अपेक्षा आहे. पुढचे कसे शांत होतील तेही पाहू. खरंतर 115 लोकांना (भाजप) 33 टक्के वाटा आणि 35 वाल्यांनाही (राष्ट्रवादी काँग्रेस) 33 टक्के वाटा, हे सत्तेचं समीकरण जुळवून सत्तेतून जेवढं मिळेल तेवढं आपल्या घशात घालण्याचं सुरु आहे. मंत्रालयात लूट सुरु आहे. पैसे मोजल्याशिवाय काम होत नाही. असं घृणास्पद आणि घाणेरडं राजकारण सुरु आहे. त्यामुळे आमच्यासारख्या राजकारण्यांची मान लाजेने खाली जातेय. या सगळ्यांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार आहे.
डबे ठेऊ नका इंजिनच लावा, वडेट्टीवार यांचा टोला
तीन इंजिनमुळे सरकार मजूबत होऊ शकतं किंवा बिघाडीही होऊ शकते असं अपक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले होते. त्याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, "डबल इंजिन ठीक आहे. आता तिसरं इंजिन, पुन्हा कोणीतरी म्हणे चौथं इंजिन. डबे ठेऊ नका इंजिनच लावा. बिना डब्याचे इंजिन असलेलं सरकार.. ज्यात लोकांना स्थान नाही फक्त सत्तेमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्थान आणि चालवणाऱ्याची मजा, मागे पब्लिक नाही, डबे नाही अशी अवस्था या लोकांची झाली आहे."
लोकसभेला काँग्रेसला महाराष्ट्रात मोठं यश मिळेल
आमच्या पक्षात लोकसभेला जबाबदाऱ्या वाटून घेऊन काम करावं लागेल. महाराष्ट्रात पोषक वातावरण आहे. सर्वांच्या नजरा काँग्रेस पक्षाकडे आहे. काँग्रेसवर विश्वास आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राला काँग्रेसला मोठं यश मिळणार आहे, आमच्या जागा वाढणार आहे, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
हेही वाचा