(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : नागपुरात 30 एप्रिलपर्यंत रस्ते, चौकावर भीक मागण्यांवर बंदी; शहरात कलम 144 लागू
Nagpur News : नागपूर पोलिसांनी (आज म्हणजेच 9 मार्चपासून 30 एप्रिलपर्यंत नागपूर शहरातील रस्त्यांवर, ट्रॅफिक सिग्नल्सवर, चौकांवर थांबून भिकाऱ्यांच्या भीक मागण्यावर, तृतीयपंथीयांद्वारे वाहनचालकांकडून पैसे मागण्यांवर बंदी घातली आहे.
Nagpur News : नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) आज म्हणजेच 9 मार्चपासून 30 एप्रिलपर्यंत नागपूर शहरातील रस्त्यांवर, ट्रॅफिक सिग्नल्सवर, चौकांवर थांबून भिकाऱ्यांच्या (Beggars) भीक मागण्यावर, तृतीयपंथीयांद्वारे (Transgenders) वाहनचालकांकडून पैसे मागण्यांवर बंदी घातली आहे. त्यासाठी नागपूर पोलिसांनी शहरात कलम 144 लागू केले आहे. तसेच या घटकांकडून फूटपाथ, रस्त्यांमधील दुभाजक तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी थांबून वाहतुकीला अडथळा होईल असे कृत्य करण्यावरही बंदी घातली आहे. कोणत्याही भिकाऱ्याने किंवा इतर कुठल्याही तत्सम व्यक्तीने या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास आयपीसी कलम 188 अन्वये त्याच्या विरोधात फौजदारी कारवाई केली जाईल असे ही नागपूर पोलिसांनी काढलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
भिकारी आणि तृतीयपंथीयांकडून वाहनचालकांकडून पैसे मागण्याचे प्रकार वाढले
गेले काही दिवस नागपूर शहरात विविध रस्त्यांवर चौकांवर ट्रॅफिक सिग्नल्सवर भिकारी तसेच तृतीयपंथयाद्वारे वाहन चालकाकडून पैसे मागण्याचे प्रकार वाढले होते. काही ठिकाणी भिकारी आणि तृतीयपंथियांकडून वाहन चालकांना दमदाटीही केली जात होती.यामुळे वाद होत होते, हाणामारीच्या घटनाही घडल्या होत्या. मात्र वाहन चालक किंवा नागरिक अशाप्रकारची कोणतीही तक्रार करत नाहीत आणि त्यामुळे असे प्रकार वाढत चालले आहेत, हे लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी आज कलम 144 अन्वये शहरातील रस्ते, चौक, ट्रॅफिक सिग्नल आणि इतर सार्वजनिक ठिकाणी भीक मागण्यावर तसेच तर तृतीयपंथीकडून पैसे वसूल करण्यावर 30 एप्रिलपर्यंत बंदीच घातली आहे.
परदेशी पाहुण्यांसमोर 'शोभा' नको म्हणून पोलिसांचे आदेश?
दरम्यान, नागपूर शहरात मार्च महिन्यात G-20 च्या उपसमितीची बैठक होत आहे. त्यासाठी 21, 22 आणि 23 मार्च रोजी सुमारे 200 परदेशी पाहुणे नागपुरात राहणार आहे. त्यांच्यासमोर नागपुरातील असं वाईट चित्र उभं राहू नये, या दृष्टिकोनातून पोलिसांनी हे बंदी आदेश लागू केल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या बंदी आदेशाचा कालावधी पाहता केवळ G-20 उपसमितीच्या बैठकीपुरतीच हे आदेश आहेत की त्यानंतरही बंदी आदेश कायम राहतील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. परंतु रस्त्यांवर भिकऱ्यांकडून तसंच तृतीयपंथीयांकडून होणारा त्रास कमी व्हावा यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात असं अपेक्षा सामान्य नागपूरकर करत आहेत.
दरम्यान रस्त्यावरील बेशिस्तपणा, अस्वच्छता वाढली होती. परिणामी नागपूरचं आक्षेपार्ह चित्र उभं राहत होतं. त्या दृष्टिकोनातून पाऊल उचलणं गरजेचं होतं. त्यामुळे रस्त्यावर भीक मागणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी कलम 144 लागू करण्यात आलं आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.
VIDEO : Nagpur मध्ये 30 एप्रिलपर्यंत रस्ते,चौकावर भीक मागण्यांवर बंदी, नागपूर पोलिसांकडून शहरात कलम 144 लागू