Nagpur News : धक्कादायक... क्राईम सिटी नागपुरात चार दिवसात 10 खून
नागपूर गुन्हेगारी आणि खासकरून थरारक हत्याकांडांसाठी ओळखला जातो. नागपुरात चार दिवसात 10 जणांची हत्या झाली आहे. नागपूरचे पुन्हा गुन्हेपूर होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
नागपूर : दिवसागणिक घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा घटनांमुळे राज्यात क्राईम कॅपिटल अशी ओळख असलेल्या नागपुरात चार दिवसात 10 जणांची हत्या झाली आहे. अर्थात यामध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्यांच्या खुनाच्या थरारक घटनेचा ही समावेश आहे. मात्र, इतर घटनांकडे पाहता नागपुरात गेले काही दिवस शांत असलेले गुंड पुन्हा डोके वर काढत आहेत का? नागपूरचे पुन्हा गुन्हेपूर होत आहे का? असे प्रश्न निर्माण झाले आहे. दुसऱ्या बाजूला या घटनांमुळे नागरिकांमध्ये ही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजे बहुतांश प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 10 पैकी 8 खून नागपूर शहरात तर दोन खून नागपूर जिल्ह्यातील कुही आणि उमरेड या ग्रामीण भागात झाले आहेत.
पहिली घटना - नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगापूर चौकात 20 जून रोजी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास शुभम ठवकर या ट्रक चालकाची हत्या करण्यात आली. दोन आरोपींनी दगड, विटा, फरशीने शुभमवर हल्ला चढविला. गंभीर जखमी झालेल्या शुभमच्या उपचाराआधीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी शोएब उर्फ जॉनी शाहिद शेख आणि विक्रांत ऊर्फ विकी महेंद्रसिंग चंदेल या दोन आरोपींना अटक केली आहे.मृतक शुभम आणि शोएब हे दोघेही ट्रक चालक असून, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण आणि मारामारी झाली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी शुभमची हत्या केली.
दुसरी घटना - दुसरी घटना 20 जून रोजी कुही तालुक्यातील मांगली शिवार येथे उघडकीस आली. वकील ज्ञानेश्वर फुले हे त्यांच्या पत्नीसह शेतावर गेले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या शेतावर काम करणारा नरेंश कुरुडकरचा मृतदेह फार्महाऊसमध्ये दिसून आला. लगेच घटनेची सूचना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा फुले यांच्या शेतावर काही दिवसांपूर्वीपर्यटन अविनाश नरुळे हा ट्रॅक्टरचालक काम करत होता. मात्र, तो डिझेल चोरी करायचा म्हणून त्याला कामावरून कमी करण्यात आले होते.अविनाश याने राकेश महाजन याच्यासोबत संगनमत करून नरेशचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले. आरोपींना माहिती मिळाली होती की वकील ज्ञानेश्वर फुले हे मोठी रक्कम फार्महाऊसमध्ये ठेवतात, तीच लुटण्याच्या उद्देशाने आरोपींनी नरेशचा खून करून तब्ब्ल 37 लाख 65 हजारांची रोकड लुटली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून 37 लाख 40 हजार रुपये जप्त केले आहे.
तिसरी घटना - नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत तिसरी घटना 21 जून रोजी उघडकीस आली. त्यात संपत्तीच्या वादातून पुतण्या आणि त्याच्या पत्नीने काकाची हत्या केल्याचे उघड झाले. नामदेव लक्ष्मण निनावे असं मृतक इसमाचे नाव असून नितीन निनावे आणि त्याची पत्नी माधुरी निनावे असे आरोपीचे नाव आहेत. काका नामदेव आणि पुतण्या नितीन एकाच घरात राहायचे. संपत्तीच्या विषयावर त्यांच्यात रोज वाद व्हायचे. दोन दिवसांपूर्वी देखील त्यांच्यात असाच वाद झाला, तेव्हा मृतक नामदेव याने नितीनच्या मुलाची गळा आवळून खून करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे संतापलेल्या नितीनने काकांच्या डोक्यावर काठीने वार करून त्यांचा खून केला. पाचपावली पोलिसांनी नामदेव निनावे यांच्या खून प्रकरणात नितीन आणि त्याची पत्नी माधुरीला अटक केली आहे..
चौथी घटना - तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी परिसरात घडली. अवघ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करून आरोपीने आत्महत्या केली होती. आरोपी आलोक मातूरकर हा टेलर होता आणि रेडिमेट गारमेंट शॉप्ससाठी तो कपडे शिवण्याचे काम करायचे. मात्र, मेव्हणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे आलोकचे कुटुंब आणि मेहुणी अमिषाचे कुटुंबात वाद सुरु होते.तसेच आलोक आणि त्याची पत्नी विजया यांच्यात ही खटके उडायचे. घटनेच्या दिवशी मध्यरात्री आलोकची सासू लक्ष्मीबाई त्याच्या घरी आलेली असताना आरोपीने सासूचे घर गाठून मेहुणी अमिषाला गाठले. सुरुवातीला दोघांमध्ये गप्पा झाल्यानंतर अचानक आलोक हिंसक झाला आणि त्याने मेव्हणीचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्याने तिथेच पोहोचलेल्या सासूची आणि नंतर रात्री उशिरा स्वतःच्या घरी जाऊन पत्नी विजया, 14 वर्षीय मुलगी परी आणि 12 वर्षीय मुलगा साहिलची ही हत्या केली. पहाटेच्या सुमारास आरोपी आलोकने स्वतः देखील आत्महत्या केली.
पाचवी घटना - नागपूर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत शिवाजी नगर भागात घडली. योगेश धोंगडे या 30 वर्षीय तरुणाची अनैतिक संबंधांची शंका आणि जुगाराच्या जुन्या वादातून हत्या करण्यात आली. गोलू धोटे नावाच्या स्थानिक गुंडाळा मृतक योगेशचे आपल्या पत्नीसोबत संबंध आहेत अशी शंका होती. त्याच शंकेतून गोलू दोन दिवसांपासून योगेश चा शोध घेत होता. घटनेच्या दिवशी गोलूने योगेशच्या घरावर हल्ला केला. मात्र, योगेश पळून गेला. गोलू आणि त्याच्या साथीदाराने योगेशला जवळच्या नाग नदीच्या पात्रात घेरले आणि अनेकांच्या देखत धारधार शस्त्राने त्याची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे नागपूर शहराच्या मध्यभागी वसलेली शिवाजी नगर झोपडपट्टी आणि अवतीभवतीचा नाग नदीच्या किनाऱ्यावरील परिसर अवैध धंद्यासाठी कुप्रसिद्ध आहे. इथे संध्याकाळनंतर मोठ्या प्रमाणावर जुगार आणि इतर अवैध कारभार चालतात...
सहावी घटना - हत्येची सहावी घटना जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत भीमसेना नगरात घडली. 22 जून च्या रात्री अक्षय लांडगे आणि त्याच्या साथीदारांनी शेषराव बनसोड या तरुणाची हत्या केली. एक महिन्यांपूर्वी मृतक शेषराव बनसोड आणि अक्षय लांडगे यांच्यात वाद झाला होता. तेव्हा शेषराव बनसोडेला पोलिसांनी अटक करत एक महिना तुरुंगात ठेवले होते. नुकतच तो तुरुंगातून सुटून आल्यानंतर जुना वचपा काढण्यासाठी अक्षय लांडगे त्याला शोधत होता. 22 जूनच्या रात्री त्याने शेषराव यांच्यावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले होते.तेव्हा पोलिसांनी अक्षय लांडगे आणि सहकाऱ्यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला होता.काल रुग्णालयात शेषरावच्या मृत्यू झाल्यानंतर अक्षय विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली आहे.
नागपूर गुन्हेगारी आणि खासकरून थरारक हत्याकांडांसाठी ओळखला जातो. मात्र, गेले काही महिने शांत असली नागपूरची गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असून गल्लीबोळात राजरोसपणे सुरु असलेले अवैध धंदे आणि त्यामुळे वस्त्यांमध्ये रोज होणारे छोटे छोटे भांडणतंटे कारणीभूत असल्याचे अनेकांना वाटत आहे. असे असले तरी अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची ठोस कारवाई दिसून येत नसल्यामुळे नागपूर पुन्हा अशांत होताना दिसतंय.