(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Gadkari : मनसे म्हणाली, मुंबई-गोवा महामार्गाला गडकरींचे नाव द्या; आता गडकरी म्हणाले, जबाबदारी माझीच! राज्य सरकारवरही फोडले खापर
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्ग अद्याप का पूर्ण झाला नाही त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. यंदा वर्षाअखेरीस हा महामार्ग पूर्ण होईल अशी ग्वाही देखील यावेळी गडकरींनी दिली.
नागपूर : मुंबई गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway) झाला नाही त्याला मी जबाबदार असल्याचं केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटलं आहे. मागील अनेक वर्षापासून मुंबई गोवा महामार्ग हा रखडलाय. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकांना मात्र याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. यावर अनेक राजकीय पक्षांनी अनेकदा भाष्य केलं. तर मनसेकडून अनेकदा या मुद्द्यावरुन राज्य सरकारला धारेवर धरत असल्याचं पाहायला मिळालं. या महामार्गाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देण्याची मागणी देखील मनसेकडून करण्यात आली.
काहीच दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या बहादुर शेख नाक्याजवळ नव्याने सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा गर्डर कोसळला. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाहनांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणीच गर्डर कोसळला त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे या महामार्गाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली होती.
त्यासाठी मीच जबाबदार - नितीन गडकरी
मुंबई गोवा महामार्गावर भाष्य करताना नितीन गडकरी यांनी म्हटलं की, 'हा मार्ग झाला नाही त्याला मी जबाबदार असून यासाठी मी इतर कोणालाही जबाबदार धरणार नाही. मात्र हा रस्ता महाराष्ट्र सरकारला दिला होता. या रस्त्यासाठी मी 75 ते 80 मिटिंग घेतल्या. मात्र त्यात यश मिळालं नाही.' पण या वर्षातच डिसेंबर पर्यंत हा रस्ता पूर्ण होईल अशी ग्वाही देखील नितीन गडकरी यांनी दिली आहे.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, 'आतापर्यंत मी अनेक रस्ते बनवले आहेत. माझ्या घरा समोरचा 2 किमीचा रस्ता मागील 10 वर्षापासून तयार होत आहे. त्यासाठी थँक्स टू वकील आणि कोर्टात जाणारे लोक.' दरम्यान हा महामार्ग लवकरच कोकणवासीयांसाठी खुला होईल अशी आशा गडकरी यांनी या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली.
रखडलेला मुंबई गोवा महामार्ग
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai goa highway) काम गेली बारा वर्षांपासून रखडले आहे. या महामार्गावरील रस्त्याची अवस्था आणि त्यावरील खड्डे याची वारंवार चर्चा होत असते. या मार्गावरुन प्रवास करणारे नागरिक या रस्त्याच्या अवस्थेबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करत असतात. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं देखील पाहायला मिळतं. . दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा ठसठशीतपणे समोर येतो. मग आंदोलने सुरू होतात, पाहणी दौरे होतात, आश्वासने दिली जातात. न्यायलये सरकारला खडसावतात मग सरकार एक नवी डेडलाईन देतं. गणपती बाप्पा गावाला जातात आणि महामार्गाचं काम मात्र जैसे थेच राहतं. दीड दशक उलटलंय पण यात तसूभरही फरक पडलेला नाही.