Nagpur : रेल्वे स्टेशनच्या परिसरात आढळली जिवंत बॉम्ब सदृश वस्तू; 55 कांड्या असलेले सर्किट सापडले
ही वस्तू इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या स्वरूपात असल्याने पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले. त्यानंतर आता ही वस्तू डिफ्युज करण्यासाठी पोलीस मुख्यालय परिसरात नेण्यात आलं आहे.
नागपूर: नागपूर रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ असलेल्या ट्रॅफिक पोलीस चौकीच्या मागे जिवंत बॉम्ब सदृश वस्तू सापडली आहे. बॉम्ब शोधक पथक म्हणजेच बीडीडीएसने ती बॉम्ब सदृश वस्तू ताब्यात घेऊन डिफ्युज करण्यासाठी पोलीस मुख्यालय परिसरात नेली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही वस्तू या ठिकाणी कोणी ठेवली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलीस या घटनेचा तपास करत असून सीसीटीव्हीच्या आधारे ही वस्तू ठेवणाऱ्याचा शोध सुरू आहे. एबीपी माझाला रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे या बॉम्ब सदृश वस्तूमध्ये एक छोटे डेटोनेटर आणि लो इंटेन्सिटीच्या स्फोटकांच्या 55 छोट्या कांड्या एकमेकांशी सर्किटने जोडलेल्या स्वरूपात होते. हे सर्किट पूर्ण असल्याने ही वस्तू अत्यंत धोकादायक आहे.
बीडीडीएसला प्राथमिक दृष्ट्या ती वस्तू जिवंत बॉम्ब असल्यासारखी वाटल्यामुळे सध्या ती वस्तू रेल्वे स्टेशनच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आली आहे. ती बॉम्ब सदृश बीडीडीएसच्या खास गाडीमधून पोलीस मुख्यालय परिसरात नेण्यात आली आहे.
संध्याकाळी सातच्या सुमारास ही बॉम्ब सदृश वस्तू रेल्वे स्टेशनच्या मुख्य दाराजवळील ट्राफिक पोलीस चौकीच्या मागे तारेने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर आधी पोलिसांनी त्याची पाहणी केली. ती वस्तू इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या स्वरूपात असल्याने पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले. त्यानंतर मुख्य दारावर तसेच मुख्य दाराच्या समोरील रस्त्यावरील वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आली. बॉम्ब शोधक पथकाने ती वस्तू ताब्यात घेऊन विशेष गाडीने पोलीस मुख्यालयात नेली आहे.
दरम्यान, डिटोनेटर आणि त्यासोबत सर्किटने जोडलेल्या त्या कांड्या किती घातक होत्या हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
- Nagpur : रेल्वे स्टेशनच्या परिसरात आढळली जिवंत बॉम्ब सदृश वस्तू; 55 कांड्या असलेले सर्किट सापडले
- LIC IPO Update: देशातील सर्वात मोठ्या आयपीओचे 2.95 पटीने सबस्क्रिप्शन, सरकारने उभारले 21 हजार कोटी रुपये
- या वेळची जनगणना ही E-Census, त्या आधारे येत्या 25 वर्षाच्या विकासाचा रोडमॅप तयार करणार: अमित शाह