LIC IPO Update: देशातील सर्वात मोठ्या आयपीओचे 2.95 पटीने सबस्क्रिप्शन, सरकारने उभारले 21 हजार कोटी रुपये
LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या आयपीओला 2.95 पटीने सबस्क्राईब करण्यात आलं आहे.
मुंबई: एलआयसी अर्थात लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा आयपीओ (LIC IPO) आज बंद झाला. एलआयसीच्या या आयपीओला 2.95 पटीने सबस्क्राईब करण्यात आलं असून ही रक्कम मोठी मानली जात आहे. सरकारने या आयपीओच्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये उभा केले आहेत.
एलआयसी आयपीओमधून किती शेअर्स बाजारात आणले?
एलआयसीने आयपीओच्या माध्यमातून 16,20,78,067 शेअर्स बाजारात आणले आहेत. शेअर बाजारातून संध्याकाळी सात वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या शेअर्ससाठी गुतंवणूकदारांच्या वतीनं 47,83,25,760 बोली लावण्यात आले आहेत.
QIB ला मिळाले 2.83 पटीने सबस्क्रिप्शन
क्वॉलिफाय इन्स्टिट्युशनल बायरच्या श्रेणीच्या शेअर्सना 2.83 पटीने सबस्क्रिप्शन मिळालं आहे. या श्रेणीसाठी आरक्षित असलेल्या 3.95 कोटी शेअर्ससाठी 11.20 कोटी बोली लावण्यात आली आहे. तसेच नॉन इन्स्टिट्यूशनल इनव्हेस्टमेन्ट श्रेणीमध्ये 2,96,48,427 शेअर्स बाजारात आणण्यात आले आहेत, त्यासाठी 8,61,93,060 बोली लावण्यात आल्या. या प्रकारे या श्रेणीला 2.91 पटीने सबस्क्रिप्शन मिळालं आहे.
एलआयसी पॉलिसी होल्डर्ससाठी या आयपीओमधील 6.9 कोटी शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी 13.77 कोटी बोली लावण्यात आल्या आहेत.
एलआयसी आयपीओसाठी बोली लावण्याची मुदत ही 4 मे ते 9 मेपर्यंत होती. एलआयसी कंपनी शेअर बाजारात 17 मेपर्यंत लिस्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर यामध्ये ट्रेडिंग सुरू होईल. एलआयसीच्या आयपीओत प्रति शेअर 902 रुपये ते 949 रुपये प्रति शेअर इतकी किंमत ठरवण्यात आली होती. आयपीओच्या एका लॉटमध्ये 15 शेअर आहेत.
एलआयसीकडे 40 लाख कोटींची मालमत्ता असून 30 लाख कोटींचा राखीव निधी आहे. एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. केंद्र सरकार याआधी एलआयसीमधील पाच टक्के हिस्सा विकणार होता. मात्र, बाजारातील अस्थिर परिस्थिती पाहता 3.5 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. एलआयसीचा आयपीओ गेल्या वर्षीच येणार होता. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे आणि बाजारातील अस्थिरतेमुळे आयपीओ उशिराने आला.