Khasdar Krida Mahotsav: खासदार क्रीडा महोत्सवाच्या सहाव्या पर्वाचा शुभारंभ; विदर्भातील खेळाडूंसाठी मोठी पर्वणी
Nagpur News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाला आज पासून सुरुवात होत आहे. यंदाच्या या खासदार क्रीडा महोत्सवाचे हे सहावे पर्व आहे.
Nagpur News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाला (Khasdar Krida Mahotsav) आज शुक्रवार 12 जानेवारी पासून सुरुवात होत आहे. यंदाच्या या खासदार क्रीडा महोत्सवाचे हे सहावे पर्व आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार. यंदाच्या या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये 60 खेळांचा समावेश करण्यात आला असून, 66 मैदानांवर ही स्पर्धा रंगणार आहे. ज्यामध्ये सायकलिंग, खो-खो, एथलेटीक्स, कबड्डी, बॅडमिंटन आणि ज्युडो हे सहा खेळ विदर्भ स्तरावर आयोजित करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे या क्रीडा महोत्सवात एकूण 1.35 कोटी रुपयांची पारितोषिके वितरीत करण्यात येणार आहे. 12 जानेवारी ते 28 जानेवारी असे 17 दिवस नागपूरात या क्रीडाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूरच्या 66 मैदानांवर रंगणार 12,500 सामने
स्थानिक खेळाडूंच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील कौशल्य सर्वांपुढे यावे, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात यंदा सुमारे 65 हजार खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 60 विविध खेळांचा समावेश करण्यात आला असून, हे सर्व खेळ नागपूरच्या 66 मैदानांवर खेळले जाणार आहे. ज्यामध्ये 12, 500 सामने आणि 1050 संघ सहभागी होणार आहे. 12 जानेवारी ते 28 जानेवारी असे 17 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 735 पारितोषिक आणि 8,980 पदकांचा समावेश करण्यात आला आहे. मध्य भारतातील हा सर्वात मोठा क्रीडा महोत्सव असल्याचा दावा आयोजकांनी केला असून जास्तीत जास्त खेळाडूंनी या मध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सहा विदर्भस्तरीय खेळांचा समावेश
यंदाच्या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सायकलिंग, खो-खो,एथलेटीक्स, कबड्डी, बॅडमिंटन आणि ज्युडो हे सहा खेळ नव्याने विदर्भ स्तरावर आयोजित करण्यात आले आहेत. यंदा लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि फ्लोअरबॉल या खेळांचा देखील नव्याने समावेश करण्यात आला आहे. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. विमा प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही स्पर्धांमधील सर्व खेळाडूंना संबंधित खेळांच्या अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन तसेच ऑफलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्याने शहारातील क्रीडा प्रेमी, खेळाडूंना ही फार मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील विशेष खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.
'या' खेळांचा असेल समावेश
खो-खो (विदर्भस्तरीय), मास्टर एथलेटिक्स, एथलेटिक्स (विदर्भस्तरीय), बास्केटबॉल (विदर्भस्तरीय), कबड्डी (विदर्भस्तरीय), क्रिकेट, जुडो, चेस, ब्रिज, फुटसल (फुटबॉल), हॉकी, कोशिकी, रायफल शूटिंग, तायक्वांदो, टेबल टेनिस, टीचर्स टेनिस बॉल क्रिकेट, स्केटिंग रोप स्कीपिंग, जिम्नॅस्टिक, फेंसिंग, सेपक टाकरा, बॅडमिंटन, फ्लोअर बॉल, क्वान की डो मार्शल आर्ट, स्विमिंग, रस्सीखेच, गर्ल्स बॉक्स क्रिकेट, हँड बॉल, मल्लखांब, सॉफ्ट बॉल, रेस्लिंग, फुटबॉल, बेंच प्रेस पॉवरलिफ्टिंग, आट्या-पाट्या, कराटे, बॉक्सिंग, आरचेरी, अष्टेडु, व्हेटेरन बॅडमिंटन, मिनी गोल्फ, एरोबिक्स अँड फिटनेस, लंगडी, गोल्फ, पिटू , लेदर बॉल क्रिकेट, मॅरेथॉन, थ्रो बॉल इत्यादि खेळांचा समावेश करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या