Nagpur Hit and Run Case: बावनकुळेंच्या लेकाच्या मित्रांचा ब्लड रिपोर्ट आला, दोघेही सुटण्याची शक्यता, सात तासांनी खेळ फिरला
Nagpur Crime: अल्कोहोलचे सेवन केले असतानाही आपल्या ऑडीक्यू 8 या कारच्या चाव्या मित्र अर्जुन हावरेला दिल्याबद्दल संकेत बावनकुळे यांच्यावर कोणतेही आरोप किंवा कलम लागणार का? संकेतचे दोन्ही मित्र सुटण्याची शक्यता
नागपूर: नागपूरच्या बहुचर्चित ऑडी कार अपघात प्रकरणी (Nagpur Hit & Run Case) वाहन चालवणाऱ्या अर्जुन हावरे तसेच सोबत बसलेल्या रोनित चिंतमवार (Ronit Chintamvar) या दोघांचा मध्यपान केल्या संदर्भातला फॉरेन्सिक रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला आहे.खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे अर्जुन हावरे (Arjun Haware) याच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये 100 मिलिलिटर रक्तात अल्कोहोलचे प्रमाण 28 मिलिग्रॅम इतके नोंदवण्यात आले आहे. तर रोनित चिंतमवार याच्या रक्तात मद्याचे प्रमाण 25 मिलिग्रॅम इतके आढळून आले आहे.
नियमाप्रमाणे फॉरेन्सिक चाचणीत 100 मिलिलीटर अल्कोहोलचे प्रमाण 30 मिलीग्रॅम असेल तर ती व्यक्ती दारूच्या अंमलाखाली प्रभावाखाली असल्याचे मानले जाते. दरम्यान या प्रकरणी दोघांची वैद्यकीय चाचणी अपघातानंतर तब्बल सात तासांनी झाल्यामुळे रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती अचूक आहे, या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. आता दोघांच्या रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ही सिद्ध झाल्यानंतर पोलीस याप्रकरणी पुढे काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल. तसेच वाहन चालवणारा अर्जुन हावरे हा दारुच्या अमलाखाली होता हे पोलीस मान्य करतात का, हेदेखील बघावे लागेल.
सात तासांनी ब्लड टेस्ट केल्याने अल्कोहोलचे प्रमाण कमी?
रोनित चिंतमवार आणि अर्जुन हावरे यांच्या रक्तात नियमापेक्षा किंचित कमी मद्याचा अंश आढळल्याने ते तांत्रिक पुराव्याच्या आधारे या प्रकरणातून सहीसलामत सुटण्याची शक्यता आहे. यासाठी रक्ताची चाचणी करण्यात झालेला उशीर कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. अपघात झाल्यानंतर रोनित आणि अर्जुनला पोलिसांनी तात्काळ अल्कोहोल टेस्ट करण्यासाठी नेले नाही. पोलिसांनी तब्बल सात तासांनी या दोघांना रक्ताचे नमुने तपासण्यासाठी नेल्याने संशय वाढला आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर काही वेळातच मेयो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्राथमिक शारीरिक तपासणीत ते दोघेही दारुच्या नशेत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आता ब्लड रिपोर्टमध्ये रोनित आणि अर्जुन यांच्या रक्तात फारसा मद्याचा अंश नसल्याचे समोर आले आहे.
अपघातानंतर लगेच ब्लड टेस्ट केली असती तर...
नागपूर हिट अँड रन प्रकरणाचा तपास सीताबर्डी पोलिसांकडून केला जात आहे. हा अपघात झाला तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे गाडीत होता. ही गाडी संकेत बावनकुळे याचीच होती. मात्र, पोलिसांनी अपघातानंतर संकेत बावनकुळे याची ब्लड टेस्ट करणे टाळले होते. पोलिसांनी रोनित आणि अर्जुन यांची अल्कोहोल टेस्ट लवकर केली असती तर वेगळे चित्र दिसले असते, अशी चर्चा आहे. सात तासांनंतर रक्तातील अल्कोहोलची पातळी कमी होणारच. दारु प्यायल्यानंतर तीस मिनिटांच्या आत अपघात झाला. अपघातानंतर लगेचच रक्ताचे नमुने गोळा केले असते तर अल्कोहोलचे प्रमाण चार पटीने जास्त दिसून आले असते, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले.
आणखी वाचा