Nagpur News : चिंता मिटली! नागपूरच्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा; बघा कशी आहे धरणांची आकडेवारी
Nagpur News : राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्याची आकडेवारी समोर आली आहे. नागपूरकरांना सध्या तरी पाण्याची चिंता करण्याचे कारण नाही. कारण, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची स्थिती समाधानकारक आहे.
Nagpur Dams Water Storage : राज्यातील धरणांमध्ये 67 टक्के पाणीसाठा (Dams Water Storage) असल्याची माहिती आकडेवारीवरुन समोर आली आहे. या आकडेवारीवरुन कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक पाणीसाठा शिल्लक आहे. तर सर्वात कमी पाणीसाठा हा मराठवाड्यातील (Marathwada) धरणांमध्ये आहे, त्यामुळे उन्हाळ्यात जलसंकटाच्या समस्येला सामोरं जावं लागणार तर नाही ना? अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी नागपूकरांना सध्या तरी पाण्याची चिंता करण्याचे कारण नाही. कारण, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह, खिंडसी आणि कामठी खैरी या धरणांमध्ये पाण्याची स्थिती समाधानकारक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात जलसंकटाचा प्रश्न नागपुरात उद्भवण्याचे संकट मावळले आहे. असे असले तरी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
काय सांगते आकडेवारी ?
गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे विदर्भातील बहुतांश जलसाठ्यांमध्ये सध्या पुरेसे पाणी उपलब्ध आहे, त्यामुळे यंदा पाण्याच्या टंचाईची समस्या जवळ जवळ मावळली असल्याचे चित्र आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह, खिंडसी आणि कामठी खैरी जलाशयातही सध्याच्या घडीला पुरेसा जलसाठा शिल्लक आहे. आजच्या तारखेत पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशयात 74.65 टक्के इतका जलसाठा आहे. गेल्यावर्षी 23 डिसेंबरला हे प्रमाण 83.03 टक्क्यांपर्यंत होते. कामठी खैरीमध्येही (कन्हान नदी) 73.82 टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळात या जलाशयात 93.80 टक्के साठा होता. त्याचप्रमाणे इतर खिंडसी जलाशयात 67.55 टक्के, तोतलाडोह जलाशयात 74.65 टक्के तर वडगाव जलाशयात 75.60 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील जलाशयाची स्थिती बघता, आज नागपूर जिल्हा प्रादेशिक अंतर्गत एकूण 16 जलाशय येतात. ज्यामध्ये आजच्या तारखेला 70.17 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मात्र मागच्याच वर्षीच्या तुलनेत याच तारखेला हा जलसाठा 80.01 टक्के इतका असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सर्वात जास्त पाणीसाठी कोकण विभागात, तर कमी मराठवाडा विभागात
मिळालेल्या आकडेवारीनुसार, कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक पाणीसाठा शिल्लक आहे. कोकण विभागातील धरणांमध्ये 79 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर सर्वात कमी पाणीसाठी हा औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये आहे. औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये फक्त 43 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे मराठवाड्यातील पाणीप्रश्न गभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये 87 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी मात्र, 67 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: