धक्कादायक! नागपूरमध्ये महिलेच्या घरात मिळालं तब्बल 12 हजार लीटर पेट्रोल, पोलिसांची कारवाई
Nagpur Crime News : पेट्रोलच्या दरवाढीनं सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत नागपूरमधील एका महिलेच्या घरी तब्बल 12 हजार लीटर पेट्रोलचा साठा मिळाला.
Petrol nagpur : पेट्रोलच्या दरवाढीनं सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. एक लीटर पेट्रोल भरतानाही लोकांना विचार करवा लागतोय. अशा परिस्थितीत नागपूरमधील एका महिलेच्या घरी तब्बल 12 हजार लीटर पेट्रोलचा साठा मिळाला. नागपूरमधील खापरी भागात सोमवारी पोलिसांनी छापा मारल्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली. पोलिसांनी पेट्रोलचा साठा जप्त केला आहे. तसेच महिलासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पेट्रोलियम कंपनीच्या डेपोपासून पेट्रोल पंपापर्यंतच्या वाहतुकीत टँकरवर बसवण्यात आलेली दुहेरी सुरक्षाव्यवस्था निकामी करून पेट्रोल चोरी करणाऱ्या रॅकेटचा नागपूर पोलिसांनी पर्दापाश केलाय. ही टोळी दररोज पेट्रोलची चोरी करत होती.
पेट्रोल, डिझेलचे रोज वाढणारे दर सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. मात्र पेट्रोलियम कंपनीचे डेपो पासून पेट्रोल पंपापर्यंत पेट्रोलियम पदार्थाच्या वाहतुकीत होणारी चोरीही अप्रत्यक्षरीत्या तुमच्या खिशाला कात्री लावत आहे. नागपूर पोलिसांनी खापरी गावात एका महिलेच्या घरी धाड टाकून तब्बल 12 हजार लिटर चोरीचा पेट्रोल जप्त केल्यानंतर पेट्रोल चोरीचा गोरखधंदा समोर आला आहे. पोलिसांनी संबंधित महिलेसह तिघांना अटक केली आहे...
पेट्रोल 77 रुपये लीटर. ऐकून धक्का बसला ना... मात्र नागपुरात एक ठिकाण असेही आहे. जिथे गेले अनेक महिने पेट्रोल 77 रुपये प्रति लिटर या दराने विकले जात होतं. पेट्रोल पंपांवर पेट्रोलच्या दराला अक्षरशः आग लागलेली असताना अवघ्या 77 रुपयात विकलं जाणारं पेट्रोल मात्र चोरीचं असायचं... विदर्भात पेट्रोलियम कंपन्यांच्या डेपो मधून निघणारे टँकर्स निर्जन ठिकाणी थांबवून त्याच्यातून हे पेट्रोल चोरी केले जायचे. आणि यामध्ये एका सराईत टोळीसह टँकर्सचे चालक ही सहभागी असायचे. पेट्रोल चोरी करणाऱ्या रॅकेट बद्दल गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नागपूर पोलिसांनी रविवारी पहाटे खापरी परिसरात हायवे लगत असलेल्या एका झोपडीवर धाड टाकली. तेव्हा हा सर्व गोरखधंदा उघडकीस आला. पोलिसांनी खापरीमध्ये निर्जन ठिकाणी असलेल्या मीना द्विवेदी नावाच्या महिलेच्या झोपडीतून पेट्रोल भरलेले अनेक कॅनसह तब्बल 12 हजार लीटर पेट्रोल जप्त केले आहे.
पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासानुसार वर्धा जिल्ह्यातील "पुलगाव" तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील "ताडाली" मधून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या डेपो मधून निघणारे टँकर्स वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात काही विशिष्ट ठिकाणी थांबतात. तिथे टँकर चालक काहीशे लिटर पेट्रोल काढून चोरीने पेट्रोल विकणाऱ्या टोळीच्या हवाली करतात. 22 लिटरची एक कॅन बाराशे ते पंधराशे रुपयेमध्ये या टोळीला विकली जाते. पुढे ही टोळी तीच कॅन सतराशे अठराशे रुपयात विकते.. मात्र, ही चोरी करताना पेट्रोलियम कंपनीची टँकरवर बसवलेली दुहेरी सुरक्षा व्यवस्था अचूकपणे निकामी केली जाते.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, विदर्भातील काही मोठा पेट्रोल डेपोमधून रोज शेकडो टँकर्स पेट्रोल घेऊन ठिकठिकाणी जातात. प्रत्येक पेट्रोल टँकर मधून काहीशे लीटर पेट्रोल चोरलं जातं. म्हणजेच पेट्रोल चोरी करणारी ही टोळी रोज हजारो लिटर पेट्रोल चोरीचा व्यवसाय पेट्रोलियम कंपन्या आणि पोलिसांच्या नाकाखाली टिच्चून करत आहे. दरम्यान काही ठिकाणी टँकरमधून पेट्रोल चोरल्यानंतर चालकांनी त्यात रॉकेल आणि इतर पदार्थांची भेसळ केल्याची ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपनीच्या डेपो पासून पेट्रोल पंप दरम्यान होणारी ही चोरी फक्त पेट्रोल पंप मालकांनाच तोटा पोहोचवते असे नाही, तर त्याचा अप्रत्यक्ष भुर्दंड पेट्रोल खरेदी करणाऱ्या सामान्य ग्राहकांनाही सोसावा लागतोय.