Nagpur Crime : बुस्टर डोस घेणाऱ्या वृद्धांना पैसे मिळत असल्याचा ढोंग, वृद्धेला गंडवले
कोरोनाचा बुस्टर डोस घेणाऱ्या वृद्धांना सरकारकडून 1.30 लाख रुपये मिळत आहेत. मात्र ते पैसे घेण्यासाठी 6 हजार रुपये आधी भरावे लागतात अशी थाप मारुन वृद्धेला महिलेने गंडवले.
नागपूर: कोरोनाचा बुस्टर डोस घेणाऱ्या वृद्धांना सरकारकडून 1.30 लाख रुपये मिळत असल्याची थाप मारून ठकबाज महिलेने एका वृद्धेला जाळ्यात अडकविले आणि 28 हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झाली. ही घटना नवीन कामठी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. पोलिसांनी कांता लक्ष्मण गोंडाणे (वय 85, रा. जयभीम चौक, कामठी)च्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
कांता नातेवाईकाची भेट घेऊन पायदळ घरी जात होती. जयभीम चौकाजवळच अंदाजे 40 वर्षांच्या महिलेने कांताला थांबविले. त्यांना त्यांचा मुलगा प्रमोद गोंडाणे यास ओळखत असल्याची बतावणी केली. त्यानंतर कोरोनाचा बुस्टर डोस घेणाऱ्या वृद्धांना सरकारकडून 1.30 लाख रुपये मिळत आहेत. मात्र ते पैसे घेण्यासाठी 6 हजार रुपये आधी भरावे लागतात अशी थाप मारली.
दागिने गहाण ठेवून पैसे
कांताने तिच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. आरोपी महिला दागिने गहाण ठेवून पैशांची व्यवस्था करून देण्याच्या बहाण्याने ऑटोमध्ये बसवून पंकज लॉजजवळ घेऊन गेली. तेथे कांताच्या कानातले दागिने आणि गळ्यातील माळ घेऊन गहाण ठेवायला जात असल्याचे सांगून त्यांना तेथेच थांबण्यास सांगितले. बराच वेळ होऊनही ती महिला परत न आल्याने फसवणूक झाल्याचे कांताला समजले. तिने आपल्या मुलाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात महिलेवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. यापूर्वीही शहरात अशा घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे.
MNS Vidarbha : राज ठाकरे तब्बल 6 दिवस विदर्भ दौऱ्यावर, महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात आखणार रणनिती
चेलानीच्या क्रिकेट सट्ट्यावर धाड, आयडी देणारा विशाल तन्नाही आरोपी
नागपूर: घरात बसून क्रिकेट सट्टयावर खायवाडी करणाऱ्या हिमांशू भूपेंद्र चेलानी (वय 32, रा. सूर्यनगर)ला गुन्हे शाखा पोलिसांनी (Crime Branch) रंगेहात अटक केली. त्याला आयडी देणारा बुकी विशाल तन्ना (रा. आंबेडकर चौक) यालाही पोलिसांनी या प्रकरणात आरोपी केले आहे. कळमना ठाण्यांतर्गत (Kalamna Police station) सूर्यनगर परिसरात राहणारा हिमांशू आपल्या घरातूनच क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली. यावेळी तो भारत आणि पाकिस्तान (India vs pakistan) दरम्यान एशिया कप अंतर्गत सुरू असलेल्या टी-20 सामन्यावर खायवडी करत होता. चौकशीत त्याने विशाल तन्नाकडून बेटरश नावाच्या साईटची आयडी (Site ID) खरेदी केल्याची माहिती मिळाली. त्याच्या मोबाईलवर खायवाडी करण्याची आयडीही मिळाली. पोलिसांनी मोबाईलचे स्क्रीन शॉर्ट आणि रोकडसह आकडा लिहिलेले कागदही जप्त केले. विशाल तन्ना पूर्वी इतर क्रिकेट बुकींकडे सौदे करायचा.
स्वतःचा साम्राज्य केला उभा
गत काही दिवसांमध्ये त्याने मोठ्या प्रमाणात खायवाडी केली आणि स्वत:च शहरातील मोठा बुकी बनला. सांगण्यात येते की, तन्नाच्या आयडीवरून अनेक लहान सट्टेबाज खायवाडी करतात. पोलिस तन्नाचा शोध घेत आहेत. ही कारवाई डीआयजी नवीनचंद्र रेड्डी आणि डीसीपी चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनात पोनि संजय जाधव, सपोनि पवन मोरे, पोहवा विजय श्रीवास, दशरथ मिश्रा, फिरोज शेख, रामचंद्र कारेमोरे, नापोशि सतीश पांडे आणि रवींद्र करदाते यांनी केली.