Nagpur Crime : दोन वेळा केली चोरी, तिसऱ्यांदा आली अन् जाळ्यात अडकली; रेल्वे स्थानकावर आरपीएफकडून अटक
Nagpur : पोलिसी खाक्या दाखवताच तिने यापूर्वी दोन वेळा चोरी केल्याची कबुली दिली तसेच चोरी करण्यात यशस्वी झाल्यामुळे तिसर्यांदा चोरीसाठी आल्याचेही तिने चौकशीत सांगितले.
Nagpur Crime : मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावर तिसर्यांदा चोरी करण्यासाठी आली. मात्र, कर्तव्यदक्ष आरपीएफ जवानांनी (RPF) सीसीटीव्हीतील व्हिडीओ पाहून तिला पकडले. सोनाली उखाडे (30), रा. रामेश्वरी असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. कायदेशीर कारवाईनंतर तिला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या कारावईमुळे रेल्वे स्थानक परिसरातील चोरट्यांमध्ये चांगली खळबळ उडाली आहे.
आधीही केली चोरी
नागपूर रेल्वे स्थानकावर 18 डिसेंबर 2022 रोजी एका महिलेचे सामान चोरी झाले होते. त्यात सोन्याच्या दागिन्यांसह 47 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, 5 जानेवारी रोजी गाडी नंबर 12849 मधून पुन्हा एका प्रवाशाचे सामान चोरी झाले. सोन्याच्या दागिन्यांसह 51 हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणातही अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद होती. दोन्ही चोरी प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक संशयित महिला आढळली. आरपीएफने या महिलेचा व्हिडीओ तयार करून विभागात सर्व जवानांना पाठवला.
व्हिडीओवरुन जवानांनी लावला शोध
रेल्वे स्थानकाच्या पूर्व (संत्रा मार्केट) प्रवेशद्वाराकडे आरपीएफ जवान भूपेंद्र बाथरी यांच्यासह आरक्षक युवराज तलमले, जवाहर सिंह, नीरजकुमार, सागर लाखे कर्तव्यावर असताना एक महिला संशयास्पद आढळली. ती व्हिडीओतील महिलेसारखीच दिसत असल्याने ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यात आली. तिने आपले नाव सोनाली सांगितले. पोलिसी खाक्या दाखवताच तिने यापूर्वी दोन वेळा चोरी केल्याची कबुली दिली तसेच चोरी करण्यात यशस्वी झाल्यामुळे तिसर्यांदा चोरीसाठी आल्याचेही तिने चौकशीत सांगितले. आरपीएफने कागदोपत्री कारवाईनंतर पुढील कारवाईसाठी तिला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.
दोघांची आत्महत्या
दुसऱ्या घटनेत शहरात विविध ठिकाणी दोन युवकांनी आत्महत्या केली. पहिली घटना एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील वैशालीनगर परिसरात घडली. रविवारी सायंकाळी दुर्गेश दत्ता निरगुरवार (वय 28) याने पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. दुसरी घटना जरीपटक्यातील इंदोरा बाराखोली येथे रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सुनील जांभुळकर (वय 31) यांनी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप कळाले नाही. दोन्ही प्रकरणी सांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
ही बातमी देखील वाचा...