एक्स्प्लोर
Advertisement
पती नागपुरात, पत्नी अमेरिकेत, व्हॉट्सअॅप कॉलवरुन घटस्फोट
अमेरिकेहून आलेली कागदपत्रं पत्नीच्या संमतीने तयार झाली आहेत आणि तिची या घटस्फोटाला पूर्ण संमती आहे, हे न्यायालयाला स्वतः तपासायचं होतं. मात्र पत्नीला उपस्थित राहणं शक्य नसल्याने व्हॉट्सअॅप कॉलवरुन तिची मान्यता कोर्टाने जाणून घेतली
नागपूर : नागपूरच्या फॅमिली कोर्टाने घटस्फोटाच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी एक अभूतपूर्व मार्ग अवलंबला. अमेरिकेत राहणाऱ्या पत्नीची घटस्फोटासंदर्भात संमती न्यायालयाने व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मान्य केली.
मूळ नागपूरचं असलेलं संबंधित जोडपं 2013 पासून अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहत होतं. 2017 पासून पती-पत्नीमध्ये बेबनाव सुरु झाला. त्यानंतर दोघंही अमेरिकेतच वेगवेगळे राहायला लागले. दरम्यानच्या काळात पतीने भारतात येऊन नागपूरच्या कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
अमेरिकेत असलेली पत्नी घटस्फोटासाठी तयार असल्याने दोघांच्या नावाने घटस्फोटासाठी संमतीपत्र तयार करण्यात आलं. पतीने त्यासाठी आवश्यक न्यायालयीन कागदपत्रे नागपुरातच तयार केली, तर पत्नीने तिची कागदपत्रं मिशिगनमधून तयार करुन पाठवली.
अखेरच्या टप्प्यात न्यायालयाला मिशिगनमधून आलेली कागदपत्रं पत्नीच्या संमतीने तयार झाली आहेत आणि तिची या घटस्फोटाला पूर्ण संमती आहे, हे स्वतः तपासायचं (ऐकायचं आणि पाहायचं) होतं. त्यासाठी पत्नीची कौटुंबीक न्यायालयात उपस्थिती आवश्यक होती. मात्र अमेरिकेतील प्रवासी कायद्यानुसार पत्नी भारतात आली तर तिला पुन्हा अमेरिकेचा व्हिसा मिळणं कठीण जाईल, ही बाब पत्नीच्या वकिलांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली.
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने पत्नीची संमती व्हिडीओ कॉलने जाणून घ्यायला मान्यता दिली. त्यानंतर कौटुंबीक न्यायालयाच्या सर्व पक्षांच्या समक्ष मिशिगनमध्ये असलेल्या पत्नीला व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल लावण्यात आला. त्यामध्ये तिने घटस्फोटासाठी आपली संमती असल्याचं आणि सर्व कागदपत्रे तिच्या संमतीने तयार करण्यात आल्याचं न्यायालयाला सांगितलं.
पूर्ण समाधान झाल्यानंतर कौटुंबिक न्यायालयाने दोघांना घटस्फोट मान्य केला. क्लिष्ट प्रकरणात अशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर केल्याने दोन्ही पक्षांचा फक्त वेळच वाचत नाही, तर त्यांना नव्याने जीवन प्रवास सुरु करता येतो, असं मत कायदातज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement