Mahavitaran : 72 तासांत बदलले 6517 रोहीत्र; राज्यभरात युद्धस्तरावर मोहीम
Mahavitaran News: गेल्या 17 दिवसांमध्ये नादुरुस्त 7,138 पैकी 6,516 रोहित्र केवळ 48 ते 72 तासांत बदलण्यात आले. सद्यस्थितीत 4,018 रोहीत्र अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध असल्याचा दावा महावितरणने केला आहे.
Nagpur News : कृषीपंपांना वीजपुरवठा (Agriculture Pump) करणारे नादुरुस्त वितरण रोहीत्र बदलण्याची मोहीम सध्या महावितरणकडून (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) राज्यभरात सुरू आहे. गेल्या 17 दिवसांमध्ये नादुरुस्त 7,138 पैकी 6,516 रोहित्र केवळ 48 ते 72 तासांत बदलण्यात आले. आता 622 नादुरुस्त रोहीत्र बदलणे शिल्लक आहे. सद्यस्थितीत 4,018 रोहीत्र अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध असल्याचा दावा महावितरणने केला आहे.
उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कृषीपंपांची वीजजोडणी थकीत आणि चालू वीजबिलांसाठी खंडित करू नये, तसेच नादुरुस्त वितरण रोहीत्र तात्काळ बदलून देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी महावितरणकडून सुरू आहे. राज्यभरात 29 नोव्हेंबरपूर्वी नादुरुस्त असलेले 6,092 व त्यानंतर 17 डिसेंबरपर्यंत नादुरुस्त झालेले 6 हजार 516 असे एकूण 12,608 नादुरुस्त रोहीत्र महावितरणकडून युद्धपातळीवर बदलण्यात आले आहेत.
कृषीपंपांना तीन फेजचा वीजपुरवठा करणारे महावितरणचे राज्यभरात एकूण 7 लाख 54 हजार वितरण रोहीत्र आहेत. यापूर्वी रोहीत्र बदलण्याची प्रक्रिया सतत सुरू असली तरी विविध कारणांमुळे सुमारे 3 ते साडेतीन हजार रोहीत्र बदलणं रोजच शिल्लक राहत होते. यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठ्याचे पाठबळ देण्यासाठी जळालेले किंवा नादुरुस्त झालेले रोहीत्र तात्काळ बदलून देण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले. राज्यभरात एकाचवेळी मोहीम सुरू करण्यात आली. आता नादुरुस्त रोहीत्रांची संख्या 622 वर आली आहे.
दुरुस्तीही वेगात
नादुरुस्त किंवा जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी महावितरणने राज्यभरात 1934 कंत्राटदार एजन्सी नियुक्ती केल्या आहेत. त्यांच्याकडे सद्यस्थितीत 11,632 रोहीत्र दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहेत. रोहीत्रांच्या दुरुस्तीचा वेग देखील प्रचंड वाढला आहे. नादुरुस्त झालेले रोहीत्र बदलण्यासाठी महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे ऑईलसह तब्बल 4,018 रोहित्र सद्यस्थितीत अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध आहेत. रोहीत्र नादुरुस्त असल्यास त्याची माहिती जवळील कार्यालय किंवा चोवीस तास सुरू असलेल्या 18002123435 किंवा 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
ही बातमी देखील वाचा