(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : चौकातील भिकारी निघाला मोबाईल चोर, पोलिसांकडून चोरीचे चार मोबाईल जप्त
रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पहिल्या घटनेत चार चोरीचे मोबाईल जप्त केले आहे. तर दुसऱ्या घटनेतील चोरट्याला 2 तासांतच अटक केली आहे.
नागपूरः लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे विभागाने महिला रेल्वे प्रवाशाचे मोबाईल चोरी (Mobile Theft) करणाऱ्याला पकडले असून त्याच्याकडून चार मोबाईल चोरीच्या घटनांचा खुलासा झाला आहे. आरोपी गोलू मेंडका काळे (वय 24) हा मुळ उत्तर प्रदेश मधील झाशी जिल्ह्यातील बबीना येथील रहिवासी आहे. आपल्यावर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून तो शहरातील काही चौकांत वस्तू विक्री करायचा तर काही चौकात भिक मागत होता.
कर्नाटकातील म्हैसूर येथील रहिवासी महिला शेषा पुनाराम काग (वय 39) यशवंतपुर-गोरखपुर एक्सप्रेसने भोपाळ येथे जात होत्या. रेल्वे नागपूरात पोहोचताच त्या पाणी घेण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरल्या. या दरम्यान झालेल्या गर्दीत त्यांचा 17 हजार रुपये किंमतीचा फोन चोरीला गेला. त्यांनी जीआरपीकडे तक्रार केली. जीआरपीच्या गुन्हे पथकाने सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने आणखी 3 मोबाईल चोरल्याची कबूली दिली. त्याच्याकडून एकूण 48340 किंमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
दोन तासांतच अटक
नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुर्व तिकीट बुकिंग काऊंटरवर चौकशी करणाऱ्या महिला प्रवाशाचे 7 हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरीला गेले होते. या चोराला पोलिसांनी दोन तासातच अटक केली. आकाश कुमार टंडन (वय 30) हा आरोपी मुळ बिलासपुर, छत्तीसगढ येथील रहिवासी आहे. याची तक्रार गुजरात येथील रहिवासी पिंकी जितेंद्र कोराडिया (वय 32) यांनी दिली होती. या प्रकरणातही सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी दोन तासातच चोरट्याला अटक केली.